तिहेरी तलाक विधेयकास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:14 AM2018-02-18T00:14:02+5:302018-02-18T00:15:53+5:30
तिहेरी तलाकवर बंदी घालणा-या विधेयकास विरोध दर्शवीत आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड अंतर्गत ईस्लाहे ए- मुशरा जालना जिल्हा कमिटीच्या महिला शाखेतर्फे शनिवारी शहरात मोर्चा काढण्यात आला.
जालना : तिहेरी तलाकवर बंदी घालणा-या विधेयकास विरोध दर्शवीत आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड अंतर्गत ईस्लाहे ए- मुशरा जालना जिल्हा कमिटीच्या महिला शाखेतर्फे शनिवारी शहरात मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषद शाळेपासून काढण्यात आलेल्या या मोर्चाचे जुना जालना ईदगाह मैदानावर सभेत रुपांतर झाले. या वेळी कमिटीच्या महिला पदाधिका-यांनी तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
केंद्र शासनाने तिहेरी तलाकवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत मंजूर केले आहे. यास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डकडून विरोध होत असून, ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सकाळी जिल्हा परिषद शाळेपासून या मोर्चास सुरुवात झाली. बुरखा परिधान करून मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग झालेल्या महिलांनी हातात फलक घेऊन आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला. गांधी चमन, शनि मंदिर, कचेरी रोड मार्गे जुना जालन्यातील ईदगाह मैदानावर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
यावेळी आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या औरंगाबाद येथील ज्येष्ठ कार्यकर्त्या फइमुन्निसा बेगम यांनी आपल्या भाषणातून तीन तलाक संदर्भात केंद्र शासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला. त्या म्हणाल्या, की मुस्लिमांचा शरियत कायदा हा नीतीमूल्य हक्क अधिकाराला जपणारा आहे. खुदा आणि रसूल यांचा पवित्र कायदा आम्ही तोडू देणार नाही. इस्लाम धर्मात व्यक्ती शरियत कायद्यावर अंमलबजावणी करून लग्न आणि संसार करते तीच व्यक्ती ख-या अर्थाने बहादूर आहे. मुस्लिम समाजाने महिलांना त्यांचे वारसाहक्क हे शरियत कायद्यानुसार दिले गेले पाहिजेत. परंतु या गोष्टी सहजपणे होत नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे. मुस्लिम समाजात विवाह साध्या पद्धतीने करायला हवेत. मात्र, आज अन्य समाजांचे अनुकरण करीत मुस्लिम समाजही विवाहात बडेजावासाठी मोठा खर्च करीत आहे. हे इस्लामला मान्य नाही. जमियुतल मोहसीनात यास्मीन साहेबा व औरंगाबाद येथील शबाना आमी म्हणाल्या की, केंद्र शासनाने मूठभर महिलांचे म्हणणे ऐकून कोट्यवधी महिलांचा विश्वासघात करीत तिहेरी तलाक बंदी कायदा करण्याची घाई केली. शासनाने ताबडतोब त्यांचे पाऊल मागे घ्यावे, नसता देशभरामध्ये यापेक्षाही जास्त मोठे आंदोलन उभारण्यात येईल.
जाहीर सभेच्या ठिकाणी मेहजबीन आणि अमीना आलमाश यांनी इंग्रजी आणि ऊर्दू भाषेत मागण्यांच्या निवेदनाचे वाचन केले. तहसीलदार विपीन पाटील यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनावर यासमीन साहेबा, जमितुल मोसीनात, फहिमूलनिसा (जमाते ईस्लामी हिंद) , नगरसेविका खान रफिया वाजेद खान, खान रुबिना अमजद खान, फरीन अजहर, फरहाना अन्सारी, शबनम कमल खान, मेराज बाजी, समीना यास्मीन अब्दुल हाफीज, अतिया सलीम, अमीना मुजीब आदींच्या स्वाक्ष-या आहेत. यावेळी तहसीलदार विपीन पाटील यांनी निवेदन स्वीकारून मोर्चेक-यांच्या भावना शासनाला कळविण्यात येईल, असे आश्वासन दिले. अमिना अलमाश यांनी सूत्रसंचालन केले तर अ. रऊफ नदवी यांनी आभार मानले.
---------------
जिल्हा परिषद शाळेपासून सुुरुवात झालेल्या महिला मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी मुस्लिम महिला बुरखा परिधान करून होत्या. हातामध्ये विविध मागण्यांचे फलक झळकत होते. शिस्तबद्धता आणि शांततेत हा मोर्चा काढण्यात आला. कोणतीही घोषणाबाजी करण्यात आली नाही.
---------------
ना बदला है, ना बदलेगा. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड खुदा और रसूल का कानून नही तोडा दिया जाऐगा, हम वक्त पडनेपर जान भी दे देंगे, अशा तीव्र भावना सहभागी महिलांनी सभेत व्यक्त केल्या. मोर्चासोबत बंदोबस्तासाठी महिला पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होत्या.