सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सर्व समाज घटकांनी आदर करावा- पोलीस अधीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 12:37 AM2019-11-05T00:37:42+5:302019-11-05T00:38:04+5:30
अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात येणाऱ्या निर्णयाचा सर्व समाज घटकांनी आदर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अयोध्या येथील राम जन्मभूमी व बाबरी मशिद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरच निकाल अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात येणाऱ्या निर्णयाचा सर्व समाज घटकांनी आदर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले.
जालना शहरातील शोभा प्रकाश मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव, सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोनि संजय देशमुख, शामसुंदर कौठाळे, सुरेंद्र गंदम यांच्यासह अधिकारी, समाज घटकातील मान्यवर उपस्थित होते. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. तसेच कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. बैठकीसाठी परशुराम पवार, कैलास जावळे, रवी देशमुख, देवाशीष वर्मा, राधाकिसन जायभाये, कडुबा सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत सोशल मीडियावर टिकाटिपणी देणे हा न्यायालयाचा अवमान ठरणार आहे. त्या दृष्टीने पोलीस दलाच्या वतीनेही सोशल मीडियावर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच जमाव करू नये, निकालानंतर कोणीही गुलाल उधळू नये किंवा निषेध करू नये, जातीय अफवा पसरवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सूचनांचे उल्लंघन करणा-यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.