...अन्यथा पुढची जबाबदारी सरकारची; विशाल जनसमुदायाच्या साक्षीने जरांगे पाटलांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 07:22 AM2023-10-15T07:22:56+5:302023-10-15T07:23:22+5:30
दहा दिवसांत आरक्षण द्या, २४ ऑक्टोबरची डेडलाईन २२ ऑक्टोबरला जाहीर करणार पुढील आंदोलनाची दिशा
विजय मुंडे/राम शिनगारे
लोकमत न्यूज नेटवर्क
आंतरवाली सराटी (जि. जालना) : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीत समाविष्ट करा. त्यासाठी येत्या २४ ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन आहे. दहा दिवसांत आरक्षण द्या, नाहीतर पुढची जबाबदारी ही सरकारचीच असेल, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी येथे विशाल जनसमुदायाच्या साक्षीने दिला. पुढील आंदोलनाची दिशा २२ ऑक्टोबर रोजी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे तब्बल १५० एकरपेक्षा अधिकच्या मैदानात जरांगे यांची शनिवारी सकाळी जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना ते म्हणाले, ३० दिवसांपूर्वी उपोषण मागे घेताना सरकारने आरक्षणाचा शब्द दिला होता. त्या शब्दावर मराठा समाज ठाम आहे. ४० दिवस सरकारला कोणीही आरक्षणाविषयी विचारणार नाही. मात्र, ४० दिवस होताच सरकारची काही खैर नाही. मराठा समाज याठिकाणी शांततेत आला आहे. पोलिसांनाही संपूर्णपणे मदत केली आहे. संघर्ष आणि त्रास सहन केल्याशिवाय गोरगरीब मराठ्यांच्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल होणार नाही.
सभेची क्षणचित्रे
n सभेसाठी संपूर्ण मैदान हाऊसफुल झाल्यामुळे दिसेल तिथे माणसे बसून होती.
n बरोबर ११ वाजता मनोज जरांगे यांचे सभास्थळी फुलांनी सजविलेल्या रस्त्यावरून आगमन. त्यापूर्वी त्यांचे कुटुंब पोहोचले. जरांगेंसह कुटुंबाचे फुले उधळून स्वागत.
n जनसमुदाय पाहताच मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. नतमस्तक होत जनसमुदायाला अभिवादन.
मराठ्यांत फूट पाडण्याचा डाव
मराठा समाज एकत्र आला आहे. त्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्ते यांच्यासारखी माणसे सोडली आहेत. त्यामागे दोन उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री असल्याचा आरोप जरांगे-पाटील यांनी यावेळी केला. तसेच या सरकारने भीतीपोटी माझे फेसबुक पेजही बंद केल्याचे त्यांनी सांगितले.
एक इंचही मागे हटणार नाही
आरक्षण मिळाल्याशिवाय इंचही मागे हटणार नाही, हा आज शब्द देतो. त्यासाठी जीव द्यावा लागला तरी तयारी असेल. आरक्षण मिळविण्याचे मराठा समाजाचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही. हे मराठ्यांचे आग्या मोहळ शांत आहे. ते शांतच ठेवा. ते एकदा का उठले तर सरकारला कठीण जाईल. - मनोज जरांगे-पाटील
शासनाकडे मागण्या
nमराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या.
nकोपर्डीच्या नराधमांना तत्काळ फाशी द्या.
nमराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या ४५ बांधवांच्या वारसांना सरकारी नोकरी व निधी द्या.
n१० वर्षांनी ओबीसी जातींचे सर्वेक्षण करून मागासलेपण दूर झालेल्यांचे आरक्षण रद्द करा.
nमराठा समाजाला व्हीजेएनटी सारखा प्रवर्ग करून ५० टक्क्यांच्या आत आरक्षण द्या.
छगन भुजबळ यांच्यावर तिखट टीका
nराज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सभेसाठी सात कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला. त्यावर जरांगे-पाटील यांनी तिखट शब्दांत टीका केली. आम्ही १०० एकरांत सभा घेत होतो, ती काही जमीन विकत घेतली नाही. सगळं शेत शेतकऱ्यांनी सभेसाठी फुकट दिलंय.
nगोरगरीब मराठ्यांचे रक्त पिऊन तुम्ही (भुजबळ) मोठे झालात. जमीन खरेदी केल्या. त्यामुळेच तुम्ही आतमध्ये (जेल) बेसन खाऊन आलात. गोदाकाठच्या १२३ गावांनी पैसे जमा केले. सभेसाठी २२ गावांचे २१ लाख लागले.
nउर्वरित गावांचे पैसे त्यांच्याकडेच जमा आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्ही छगन भुजबळ यांना योग्य शब्दांत समज द्या, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले.