मोकाट फिरणाऱ्या १,०३३ पैकी २७ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:30 AM2021-04-25T04:30:14+5:302021-04-25T04:30:14+5:30
अँटिजन तपासणी : मागील सहा दिवसांत १,००६ जणांचे अहवाल निगेटिव्ह जालना : संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाटांची ...
अँटिजन तपासणी : मागील सहा दिवसांत १,००६ जणांचे अहवाल निगेटिव्ह
जालना : संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाटांची पोलीस, पालिकेच्या पथकाकडून अँटिजन तपासणी केली जात आहे. गत सहा दिवसांमध्ये १,०३३ जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यात २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सुपर स्प्रेडर ठरणाऱ्यांना पोलिसांनी कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४० हजारांवर गेली असून, त्यातील ६३० जणांचा बळी गेला आहे. जालना शहरातील वाढलेली रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाने संचारबंदीचे नियम काटेकोरपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शहरातील जवळ ३६ पाॅइंटवर २०० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे, शिवाय नगरपालिका, आरोग्य विभाग आणि शिक्षकांची टीमही या कामी पोलिसांची मदत करीत आहे. संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले, परंतु अनेक नागरिक विशेषत: युवक मोकाट रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी रस्त्यावर माेकाट फिरणाऱ्यांची अँटिजेन तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, मागील सहा दिवसांपासून शहरातील विविध भागांत विनाकारण फिरणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. सहा दिवसांत १,०३३ जणांची अँटिजन तपासणी करण्यात आली आहे. त्यात २७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. ज्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला, त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कोरोनाबाधितांची संख्या शहरात वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या अटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरासह इतर प्रशासकीय सूचनांचे पालन करणे हीच काळाची गरज आहे. संचारबंदीतील सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पथकांमार्फत दंडात्मक कारवाई केली जात आहे. कोणी दुकाने सुरू ठेवल्याचे दिसून आले, तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल.
- विनायक देशमुख, पोलीस अधीक्षक, जालना.