बाह्यरुग्ण विभाग बारा तास बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:18 AM2018-01-03T00:18:33+5:302018-01-03T00:18:44+5:30
राष्ट्रीय वैद्यकीय विधेयकाला विरोध करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संस्थेने (आयएमए) पुकारलेल्या संपात जालन्यातील २६० डॉक्टरांनी रुग्णालये बंद ठेवून सहभाग नोंदवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राष्ट्रीय वैद्यकीय विधेयकाला विरोध करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संस्थेने (आयएमए) पुकारलेल्या संपात जालन्यातील २६० डॉक्टरांनी रुग्णालये बंद ठेवून सहभाग नोंदवला. बाह्यरुग्ण विभाग बारा तास बंद राहिल्यांनी रुग्णांची गैरसोय झाली.
संपाबाबत आयएमएचे अध्यक्ष डॉ. छाबडा म्हणाले, की नवीन विधेयकामुळे भ्रष्टाचार वाढेल. खाजगी वैद्यकीय कॉलेजवर कोणाचाही धाक राहणार नाही. हे विधेयक डॉक्टरांच्या विरोधात असल्याने देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारला होता. आयएमएशी संलग्न सर्व डॉक्टर या संपात सहभागी झाले.
दरम्यान, डॉ. धीरज छाबडा, सचिव डॉ. आशुतोष सोनी, डॉ. रामेश्वर सानप, डॉ. ख्रिस्तोफर मोजेस, डॉ. प्रकाश सिगेदार यांच्यासह अन्य डॉक्टरांनी दुपारी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
तर दुसरीकडे राष्ट्रीय आरोग्य विधेयक रुग्णांच्या हिताचे असून, त्यामुळे खाजगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप बसणार आहे. या विधेयकामुळे सर्व रुग्णालयांमध्ये तक्रार निवारण मंच स्थापन करणे अनिवार्य राहणार आहे. त्यामुळे खाजगी डॉक्टरांकडून यास विरोध होत आहे. रुग्णहिताशी संबंधित या विधेयकाचे लवकरच कायद्यात रुपांतर करावे, अशी मागणी जनस्वास्थ्य अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सगीर अहेमद रजवी यांनी केली आहे. दरम्यान, सायंकाळी डॉक्टरांनी संप मागे घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.