परतूरच्या रेल्वे उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:23 AM2017-12-13T00:23:29+5:302017-12-13T00:24:10+5:30

आष्टी रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे कायम असून यामुळे वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी कधीही मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे

Over-bridge work pending from 3 years | परतूरच्या रेल्वे उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे

परतूरच्या रेल्वे उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : आष्टी रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे कायम असून यामुळे वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी कधीही मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे. या पुलाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांसह वाहनधारकांतून होत आहे.
परतूर शहरासह ग्रामीण भागातील वाहनधारकांसाठी आष्टी रेल्वेगेट ओलांडून जाणे म्हणजे जीव धोक्यात घालणे आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून या उड्डाणपुलाच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासन चालढकल करीत आहे. यातच राजकीय हितसंबंध जपण्याचाही प्रकार होत आहे. मात्र, सद्यस्थितीत रेल्वे गेट ओलांडणे म्हणजे तारेवरची कसरत ठरत आहे. दहा-दहा मिनिटांनी हे गेट बंद होेते. दैनंदिन वाहतूक व बागेश्वरी साखर कारखाना सुरू झाल्याने उसाने भरलेले, ट्रक व ट्रॅक्टर त्यात दोन-दोन ट्रॉली ही जड वाहनेही याच रस्त्याने धावत आहेत. या रेल्वे गेटजवळ पडलेले खड्डे व गतिरोधक यामुळे उसाने भरलेली वाहने अडकून उलटत आहेत. तर काही वाहने या ठिकाणी अडकून पडत आहेत.
वीस- पंचवीस खेड्यांची वाहतूक या गेटमधून होत आहे. वेळोवेळी बंद होणारे रेल्वे गेट व वाढलेली वाहनांची संख्या यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ उडतो. अनेकदा हे रेल्वे गेट तोडून, या गेटला धडकून वाहनांचे अपघात घडले आहेत. तरीही संबंधितांना याचे सोयरसुतक नाही. या पुलासाठी निधी उपलब्ध आहे. तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.
खडकांच्या तपासण्या झाल्या आहेत. नकाशा तयार आहे. तरीही काम मागील तीन वर्षांपासून रखडले आहे. रेल्वे गेट बंद झाल्याने ग्रामीण भागातील अत्यवस्थ असलेले रुग्ण वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्याने अनेकदा दगावले आहेत. अपघात घडले आहेत.
ही खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेकदा रेल्वे सेवाही विस्कळीत होत आहे. तरी या उड्डाणपुलाचे काम तात्काळ हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Over-bridge work pending from 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.