धामणापाठोपाठ ‘पद्मावती’लाही गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:39 AM2019-07-08T00:39:06+5:302019-07-08T00:39:22+5:30

भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरणाला लागलेली गळती थांबते न थांबते तोच आता पारध येथील पद्मावती धरणाच्या सांडव्याला गळती लागली आहे

Padmavati also leakages after 'Dhamma' | धामणापाठोपाठ ‘पद्मावती’लाही गळती

धामणापाठोपाठ ‘पद्मावती’लाही गळती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन / पारध : भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरणाला लागलेली गळती थांबते न थांबते तोच आता पारध येथील पद्मावती धरणाच्या सांडव्याला गळती लागली आहे. या प्रकारामुळे धरणाच्या खालील भागातील नागरिकांची झोप उडाली आहे. दरम्यान, शेलूद येथील ग्रामस्थांमध्ये धरण फुटण्याची भिती कायम असून, गावातील शाळा, मंदिरामध्ये अनेक ग्रामस्थ रात्र काढत आहेत.
शेलूद येथील प्रकल्पाच्या सांडव्याला लागलेल्या गळतीमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण होते. विभागीय आयुक्तांनी पाहणी करून अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यानंतर विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धरणावर ठाण मांडून गळती रोखण्याचे काम केले. मात्र, धरण फुटण्याच्या भितीने त्रस्त झालेल्या शेलूद ग्रामस्थांनी शनिवारी भर पावसात पिंपळगाव रेणुकाई ते धावडा रस्ता दोन तास रास्तारोको आंदोलन केले. नायब तहसीलदार रमेश तांगडे यांनी कर्मचा-यांसह आंदोलनस्थळी धाव घेऊन ग्रामस्थांचे ग-हाणे ऐकूण घेतले. त्यानंतर गावातील जिल्हा परिषद शाळा, गजानन महाराज मंदिर आणि सरस्वती विद्यामंदिरात ग्रामस्थांच्या राहण्याची सोय करण्यात आली. त्यामुळे शनिवारी रात्री ग्रामस्थांनी गजानन महाराज मंदिर, सरस्वती विद्यामंदिर, जिल्हा परिषद शाळेत जागा मिळेल तेथे रात्र काढली. रविवारी दिवसभर अनेकांनी शेतशिवार गाठल्याने जुन्या शेलूद गावात शुकशुकाट होता.
धामणा धरणाची गळती थांबते न थांबते तोच आता पारध परिसरातील पद्मावती धरणाला देखील तडे गेल्याचे समोर आले आहे. या धरणातील हजारो लिटर पाणी गळतीमुळे वाया जात असून, धरणाखाली खालील धामणगाव, डोमरुळ, टाकळी, कुंबेफाळ आदी गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
पद्मावती धरणाची १९९२ साली निर्मिती झालेली आहे. या धारणासाठी ९० टक्के जमिनी पारध परिसरातील संपादीत केलेल्या आहेत. मात्र हे धरण विदर्भातील चिखली पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. संबंधित विभागाने धरणाकडे दुर्लक्ष करीत हात वर केले आहेत. महामंडळ आणि पाटबंधारे विभागातील वादामुळे या प्रकल्पाची डागडुजी आजवर झालेली नाही. मात्र, गळतीमुळे या भागातील शेतक-यांसह सर्वसामान्यांची झोप उडाली आहे. प्रशासनाने लक्ष देऊन या धरणाला लागलेली गळती थांबवावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, तालुक्यातील नागरिकांनी सतत दुष्काळाचा सामना केला आहे. यंदा पाऊस समाधानकारक झाला आहे. मात्र, गळतीमुळे साठलेले पाणी वाहून जाण्याची भिती आहे.
डागडुजीसाठी अधिका-यांचे धरणावर ठाण, सांडवा परिसरात विजेची केली सोय
ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये म्हणून महसूल विभागाच्या पथकासह पाटबंधारे विभागाचे कर्मचारी धामणा धरणावर ठाण मांडून आहेत.
शिवाय आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस पथक तंबू ठोकून आहे. हे कर्मचारी पाळीने धरणावर पहारा देत आहेत.
रात्रीच्या वेळी धरण व सांडव्याच्या परिसरात विजेची व्यवस्था करण्यात आली आल्याची माहिती अधिका-यांनी दिली.

Web Title: Padmavati also leakages after 'Dhamma'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.