पान चारचा पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:40 AM2020-12-30T04:40:50+5:302020-12-30T04:40:50+5:30

जालना : भाग्यनगर येथील मराठा सेवा संघाच्या सभागृहाच्या नूतनीकरणासाठी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी सात लाख ...

Page four strap | पान चारचा पट्टा

पान चारचा पट्टा

Next

जालना : भाग्यनगर येथील मराठा सेवा संघाच्या सभागृहाच्या नूतनीकरणासाठी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी सात लाख रूपयांची देणगी दिली आहे. मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक आर.आर. खडके व जिल्हा सचिव काकासाहेब खरात यांच्याकडे रक्कमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी नगरसेवक संतोष अन्नादाते, माजी पं. स. सदस्य अण्णासाहेब खंदारे, सोपान सपकाळ, मधुकर सोनवणे हे उपस्थित होते.

स्वाती मारोळे यांचा शिक्षक सेनेकडून सत्कार

जालना : ओबीसी फाऊंडेशन इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षा स्वाती मोराळे यांचा शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष बालासाहेब आबुज यांनी सत्कार केला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी रत्नाकर मोराळे, राहुल मुंडे, शिवराज आबुज, सुदाम गुंड, श्वेता आबुज, सुरेश भालेकर, दीपक वाघ आदींची उपस्थिती होती.

चनेगाव येथे ७७ हजाराची घरफोडी

बदनापूर : चनेगाव येथे झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी रोख २० हजारासह सोन्या-चांदीचे दागिणे असा ७७ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही चोरी सोमवारी पहाटे उघडकीस आली. चनेगाव येथील विनायक बाळाजी शेवाळे हे आपल्या मुलांसह घरात झोपले होते. चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर त्यांच्या घराचे कुलूप तोडून रोख २० हजार रूपये व दागिणे लंपास केले.

अंबड चौफुली रस्त्यावर धु‌ळीचे साम्राज्य

जालना : शहरातील अंबड चौफुली ते शनिमंदिरसह रेल्वेस्थानक रस्त्यावर धु‌ळीचे साम्राज्य पसरले आहेत. मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने वाहनधारकांना नाहक त्रस्त सहन करावा लागत आहे. सतकर कॉम्प्लेकस, भाजीमंडई परिसरात नेहमीच धूळ असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ असते. उड्डाण पुलावर मोठाले खड्डे असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. अनेक महिन्यांपासून पडलेला पुलाचा कठडा अद्याप तसाच आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

वालसावंगी येथील रूग्णवहिका दुरूस्त

वालसावंगी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिकेत बिघाड झाल्याने दोन महिन्यांपासून दुरूस्तीसाठी जालना येथे पडून होती. रूग्णवाहिका नसल्याने रूग्णांचे हाल होत होेते. तातडीने रूग्णवाहिका देण्याची मागणी रूग्णांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन रूग्णवाहिका पाठविण्यात आली आहे. ही रूग्णवाहिका जुनी असून, नवीन देण्याची मागणी होत आहे.

धावडा येथे खाते उघडण्यास बॅंकेत गर्दी

धावडा : भोकरदन तालुक्यातील धावडा येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र व जालना जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या धावडा शाखेत खाते उघडण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीतील इच्छुकांनी सोमवारी मोठी गर्दी केली होती. भोरखेडा, आडगाव, पोखरी, वडोदतांगडा, धावडा येथील इच्छुक उमेदवार बॅंकेत नवीन खाते उघडण्यासाठी येत आहेत. या गर्दीमुळे इतर आर्थिक व्यवहाराची कामे विस्कळीत झाली आहे.

बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय दूर

अंबड : तालुक्यातील लोणार भायगाव परिसरातून जाणारी जालना-पैठण- बस सुरू झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली आहे. जालना ते पैठण ही बदनापूरसह लोणार भायगाव, जामखेड, पाचोडमार्गे जाणारी बस बंद झाली होती. ही बस सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. या मागणीची दखल घेऊन बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

गोदाकाठावर बहरली रब्बीची पिके

गोंदी : अंबड तालुक्यातील गोंदीसह परिसरातील गोदाकाठवरील दहा ते पंधरा गावात वेळेवर पेरणी, मुबलक पाणी आणि पोषक वातावरणामुळे यंदा शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम बहरला आहे. ज्वारी, गहू, हरभरा आदी पिके सद्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. या पिकांचे नियोजन लावण्यासाठी शेतकरी शेतावरच मुक्कामी राहात आहेत. त्यामुळे शेतशिवार गजबजलेले आहे. अतिवृष्टीने बारगळलेल्या खरीप हंगामामुळे शेतकऱ्यांची धादल उडाली आहे. आता रब्बीसाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे.

लोंढेवाडीत अवैध दारू जप्त

जालना : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी जालना ते घनसावंगी रोडवरील लोंढेवाडी येथे छापा टाकून चारचारी वाहनासह अ‌वैध दारू जप्त केली आहे. यामध्ये देशी दारूच्या १९२ बाटल्या, विदेशी दारूच्या १४४ बाटल्या जप्त केल्या आहेत.

शेतकरी कुटुंबाचे उपोषण

तीर्थपुरी : राजाटाकळी शिवारातील शेतात ये-ज करण्यासाठीचा रस्ता मोकळा करावा, या मागणीसाठी शेतकरी इंदुबाई सुरासे यांनी कुटुंबासह शेतातील विहिरीसमोर मंडप टाकून सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे. संबंधित विभागाला वारंवार निवेदन देऊन काहीच उपयोग झाला नाही.

रस्त्यावर खड्डा

अंबड : शहरातील जालना महामार्गालगत असलेल्या शारदानगरमधील रस्त्यावर खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघाताची भीती वाढली आहे. पालिकेने खड्डा बुजविण्याकडे दुर्लक्ष केले आहेत. खड्ड्याचा अंदाज यावा म्हणून काट्या टाकण्यात आल्या आहेत.

Web Title: Page four strap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.