पान चारचा पट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:30 AM2020-12-31T04:30:01+5:302020-12-31T04:30:01+5:30
बदनापूर : ओबीसींच्या प्रश्नांबाबत रविवारी येथील सावता सभागृहात तालुकास्तरीय बैठक झाली. दरम्यान, ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी, एसबीसी यांचा २०२१ ...
बदनापूर : ओबीसींच्या प्रश्नांबाबत रविवारी येथील सावता सभागृहात तालुकास्तरीय बैठक झाली. दरम्यान, ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी, एसबीसी यांचा २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये वेगळा कॉलम करून जनगणना व्हावी, अशी मागणीही करण्यात आली. महाज्योतीला भरीव तरतूद देऊन ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सरकारने पावले उचलावीत, नोकरभरती तात्काळ सुरू करावी, आदी बाबी या बैठकीत नमूद करण्यात आल्या. २४ जानेवारीला जालना येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नियोजनाबाबतही चर्चा करण्यात आली.
अंनिस जालना शाखेतर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन
जालना : अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती जिल्हा शाखेतर्फे बाबा ते बाबा प्रधोधन अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेंसह विविध उपक्रम घेण्यात येणार आहे. निबंध स्पर्धेत संत व समाजसुधारकांचा अंधश्रध्दाविरोधी लढा, अंधश्रध्दांचे दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजना, प्रसारमाध्यमे आणि अंधश्रध्दा, अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे योगदान असे विषय आहेत. ही स्पर्धा ऑनलाईन होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा संघटक सुनील वाघ, जिल्हाध्यक्ष मोहन राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष काकासाहेब खरात, उपाध्यक्ष डॉ. एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
सानुग्रह योजनेतून धनादेश प्रदान
जाफराबाद : तहसील कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुरेश दळवी यांच्या पत्नी गोदावरी दळवी यांना सानुग्रह योजनातून शासनाच्या वतीने तहसीलदार सतीश सोनी यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी महसूल सहायक विनोद उगले, देवेश नवले, गजानन चिंचोले, भरत आढाव आदींची उपस्थिती होती.
वालसावंगीत मल्चिंग पेपरवर कांदा लागवड
वालसावंगी : परिसरातील शेतकरी नवनवीन प्रयोग करून शेती करत आहेत. यामध्ये मल्चिंग पेपरद्वारे मिरची, वाटणा, झेंडू, कलिंगड यासह अन्य पिकांची लागवड करीत आहेत. येथील मुकेश भुते यांनी नवीन प्रयोग करीत मल्चिंग पेपरवर कांदा लागवड केली आहे. पाण्याचे नियोजन म्हणून ठिबकचा आधार दिला आहे. सध्या हे कांदा पीक बहारदार अवस्थेत असून, यातून चांगले आर्थिक उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर शेतकरी पाण्याच्या उपलब्धेने कांदा लागवड करत आहे.
जाफराबाद येथे १६३ उमेदवारी अर्ज
जाफराबाद : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान, तेरा ग्रामपंचातीसाठी मंगळवारी १६३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात टेंभुर्णीतील तब्बल ४५ अर्जांचा समावेश आहे. याशिवाय आंबेवाडीतील ५, सातपेळचा एक, शिराळा येथील ३, अकोला १९ आदी गावातील अर्ज आले आहेत.
दत्त जंयतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
अंबड : येथील स्वामी समर्थ मंदिराच्या सभागृहात गुरूवारी स्वामी सेवा मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या कोविड-१९ चा प्रादुर्भाव असल्यामुळे रूग्णआंना रक्तपुरवठा कमी पडत आहे. यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, जास्तीत -जास्त जणांनी रक्तदान करावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले.
भोकरदन येथे आज नेत्रतपासणी शिबिर
भोकरदन : माजी नगरसेवक स्व. जयेश प्रसाद थारेवाल मित्रमंडळाच्या वतीने गुरूवारी सकाळी ९ वाजता रक्तदान महाराज महायज्ञ, मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर आयोजित करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील लायन्स क्लब संचिलित लायन्स नेत्र रूग्णालयाच्या वतीने नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भताने यांचा सत्कार
जालना : येथील डॉ. गोविंद भताने यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट सेवाकार्याबद्दल त्यांचा राज्यपालांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
जुने रेल्वे फाटक होणार बंद
परतूर : येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला वेग आला असून, या आठवड्यात रेल्वे पटरीवर पूल उभारण्याच्या मुख्य कामासाठी जुने रेल्वे फाटक बंद होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जुने फाटक बंद झाल्याने नव्या फाटकातून वाहतूक सुरू केली जाईल.
वेतन देण्याची मागणी
जालना : जालना नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्ती वेतन देण्यात यावे, अशी मागणी भारतीय स्वच्छकार एकता मंचच्या वतीने करण्यात आली. या निवेदनावर सचिव धोंडिराम वाहुळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कार्याध्यक्षपदी डोळस
आष्टी : गोळेगाव येथील बबन डोळस यांची जालना जिल्हा पोलीस पाटील असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली. राज्याध्यक्ष महादेव नागरगोजे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.