पान तीन लहान बातम्या ३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:27 AM2020-12-24T04:27:17+5:302020-12-24T04:27:17+5:30
भोकरदन : शहरासह ग्रामीण भागात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. वाढत्या थंडीमुळे अबाल-वृध्दांसह नागरिकांना सर्दी, खोकला, ताप आदी आजार ...
भोकरदन : शहरासह ग्रामीण भागात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. वाढत्या थंडीमुळे अबाल-वृध्दांसह नागरिकांना सर्दी, खोकला, ताप आदी आजार जडू लागले आहेत. हे आजार म्हणजे कोरोनाची लक्षणे असल्याने अनेकांनी शासकीय रूग्णालयात न जाता खासगी रूग्णालयात जाऊन उपचार घेण्यावर भर दिला आहे. शहरातील खासगी रूग्णालयात सध्या रूग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
घोलप यांचा सत्कार
जालना : सावता परिषद युवक संघटनेच्या जालना तालुकाध्यक्षपदी एकनाथ घोलप यांची निवड करण्यात आली आहे. घोलप यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल घोलप यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अंबेकर, घोलप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संदीप मगर आदींची उपस्थिती होती.
केंधळीत वन विभागाच्या पथकाकडून पाहणी
मंठा: तालुक्यातील केंधळी शिवारात चार दिवसांपासून वाघ असल्याची चर्चा सुरू आहे . या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या पथकाने केंधळी परिसरात वन्य प्राण्यांच्या ठशांची पाहणी केली. त्यावेळी तो प्राणी वाघ नसून तडस असण्याची शक्यता वर्तविण्यात आली. यावेळी वनरक्षक रूक्मिनी बनसोडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती देत भरपाईची मागणी केली. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
माहोऱ्यात विजेचा लपंडाव
माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा व परिसरात गत काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे . ओव्हर लोडच्या नावाखाली गावातील वीज १६ तास जात राहत आहे . गावातील उपकेंद्रात अभियंता फिरकत नाहीत. अभियंत्यांशी संपर्कही होत नाही. त्यामुळे होणारा त्रास मांडायचा कोणाकडे ? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. वीज समस्या न सोडविल्यास तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
अवैध प्रवासी वाहतूक
परतूर : शहरासह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, अपघाताचे प्रमाण वाढले आहे . मात्र, असे असताना अनेक वाहन चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून वाहने चालवित आहेत. त्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.