पान तीन लहान बातम्या ३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:24 AM2020-12-25T04:24:40+5:302020-12-25T04:24:40+5:30
बदनापूर : तालुक्यातील काजळा ते रांजणगाव या तीन किलोमीटर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या भागातील शेतकऱ्यांसाठी हा रस्ता ...
बदनापूर : तालुक्यातील काजळा ते रांजणगाव या तीन किलोमीटर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या भागातील शेतकऱ्यांसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. मात्र, खराब रस्त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषत: पावसाळ्यात या रस्त्यावरून चालणेही मुश्किल होऊन जाते. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
युवा संगठनचे निवेदन
जालना : राष्ट्रीय युवा संगठनच्या वतीने तीन दिवस आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांची जनजागृती करण्यात आली. तसेच मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांना देण्यात आले. यावेळी राज्य संयोजक रवी वाघमारे, ज्ञानेश्वर सोनवणे, अभिषेक वायाळ, विजय हवाले, विशाल भिसे, शाहरूबी सय्यद, भागवत ढवळे, सुनील गव्हाले यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
वरूड येथील वीज ग्राहकांची जनजागृती
वरूड : एक गाव एक दिवस मोहिमेंतर्गत वीज वितरण कंपनीच्या वतीने वरूड (बु.) येथील वीज ग्राहकांची जनजागृती करण्यात आली. यावेळी वरिष्ठ लिपिक जैवाल, एस.डी. पाटोळे यांनी वीज ग्राहकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच विजेबाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले. यावेळी एस. के. कोलते, व्ही. एस. जाधव, एस. ए. ढापसे, एन. आर. पायघन, डी. एस. गारोडी, दिनेश पायघन, गजानन कड, कृष्णा कड, आर. एस. दाभाडे आदींची उपस्थिती होती.
सूचनांचे उल्लंघन
जाफराबाद : सध्या शहर व तालुक्यात कोरोनाचे रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण घटले आहे. असे असले तरी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अनेक नागरिक मास्कचा वापर करीत नाहीत. शिवाय ठिकठिकाणी गर्दी पहावयास मिळत आहे. अनेक व्यावसायिकांनी सॅनिटायझर ठेवणेही बंद केले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा पुन्हा फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
नागरिकांची गैरसोय
भोकरदन : शहरातील प्रमुख मार्गासह बाजारपेठेत मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. अनेक जनावरे प्रमुख मार्गावर, अंतर्गत रस्त्यावर ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, अपघाताचाही धोका वाढला आहे. शिवाय पादचारी नागरिकांना या जनावरांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.