पेंटर झाला विद्यापीठात पी.एच.डी.धारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:20 AM2019-06-02T00:20:59+5:302019-06-02T00:22:44+5:30
घरात शिक्षणाची कुठलीही परंपरा नसताना देखील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका तरुणाने जिद्द, चिकाटी व मेहनतीने ज्या विद्यापीठात विद्यापीठ हे नाव लिहिले. त्याच विद्यापीठात त्या तरुणाने पी.एच.डी प्रदान केली आहे
दिगंबर गुजर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभारपिंपळगाव : घरात शिक्षणाची कुठलीही परंपरा नसताना देखील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका तरुणाने जिद्द, चिकाटी व मेहनतीने ज्या विद्यापीठातविद्यापीठ हे नाव लिहिले. त्याच विद्यापीठात त्या तरुणाने पी.एच.डी प्रदान केली आहे. एकंदरीत या तरुणाची ही कामगिरी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
प्रा. डॉ. गणेश विश्वनाथ कंटुले असे या पीएचडी धारक विद्यार्थ्याचे नाव असून, ते सध्या जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील मत्स्योदरी कला व विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागात अध्यापनाचे कार्य करत आहे. घनसावंगी येथील जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयातून १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यानी औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात बी. ए. ही पदवी घेतली. त्यानंतर सी. जे. बी. जे., एम.एम.सी.जे. मराठी विषयात एम.ए. एम. फिल. अन आता पीएचडी ही शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च पदवी घेऊन त्यानी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.
लहानपणापासून त्यांच्या हाती ब्रश होता. विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोर असणाऱ्या महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्याची रंगरंगोटी असो की, विद्यापीठाच्या मुख्य कमानीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नावाची पेंटिंग ही त्यानी त्याकाळी केली होती. पदवीप्रदान कार्यक्रमाचे बॅनर्स, साईज बोर्डस, कापडी बॅनर्स, वॉल पेंटिंग, डिजिटल बॅनर्स, व्यक्तीचित्र, निसर्गचित्र, वारली पेंटिंग, दगडी कोनशिला, रेडियम अक्षरे, दुकानाच्या पाट्या अशी अत्यंत कलाकुसरीची अनेक कामे करत त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले.
विद्यापीठाचा अधिकृत पेंटर पीएचडी मिळवून डॉक्टर होऊ शकतो, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखविले.
पदवी मिळविण्यासाठी त्याला प्रा. डॉ. सुभाष बागल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, त्याच्या जिद्दीने तो आज पीएचडी धारक बनला आहे. त्यामुळे कृंभार पिंपळगाव परिसरातून त्याचे कौतूक होत आहे.