समितीकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:00 AM2018-09-26T01:00:26+5:302018-09-26T01:01:15+5:30
पंचायत राज समितीच्या अध्यक्षांसह अन्य सदस्य आमदारांनी मंगळवारी जालना जिल्हा परिषदेत मॅरेथॉन बैठक घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पंचायत राज समितीच्या अध्यक्षांसह अन्य सदस्य आमदारांनी मंगळवारी जालना जिल्हा परिषदेत मॅरेथॉन बैठक घेतली. यात मुख्य कार्यकारी अधिका-यांसह अन्य अधिका-यांची चांगलीच कान उघाडणी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एकूणच रस्ते, सिंचन, शिक्षण यासह वित्त आयोगाचा निधी यावरून बैठकीत अधिका-यांना धारेवर धरण्यात आले. एवढेच नव्हे तर, विभागीय आयुक्तांशी थेट बैठकीतून संपर्क करून एका महिन्याच्या आत सर्व अहवाल समिती समोर सादर करण्याचे निर्देश पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
पंचायत राज समिती येणार म्हणून जिल्हा परिषदेला यापूर्वीच दौरा कळविलेला होता. असे असताना आवश्यक ती खबरदारी प्रशासनाने घेतली नसल्याचे वास्तव बैठकीत समोर आले आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्यावर सदस्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. सदस्यांचे समाधान होईल असे उत्तर मिळत नसल्याने बैठकीत चांगली गरमा गरमी झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. अनेक महत्वाच्या विकास कामांमध्ये आवश्यक ते निकष पाळले नसल्याचे दिसून आले.
तीन वर्षापूर्वीच्या लेखा परीक्षण अहवालवरही यावेळी चर्चा झाली. त्या काळात जे अधिकारी येथे कार्यरत होते त्यांचीही साक्ष घेण्यात आली.
तत्कालीन अधिका-यांप्रमाणे विद्यमान कार्यरत अधिका-यांनाही सदस्यांनी अनेक मुद्यावरून कोंडीत पकडले. विशेष म्हणजे या समितीने दौरा पुढे ढकलावी म्हणून चर्चेत असलेला मुद्दा समिती सदस्यांपर्यंत पोहोचला होता. दरम्यान समितीने शासनाच्या ज्या काही कल्याणकारी योजना आहेत, त्यांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. आज ही बैठक जिल्हा परिषदेतील स्व. यशवंतराव सभागृहात साडेतास चालली. यावेळी समितीचे जवळपास १५ सदस्यांची उपस्थिती होती.
बुधवारी ही समिती चार जणांची टीम करून आठही तालुक्यांना भेट देणार आहे.
कुठल्या कामाची पाहणी होते याकडे लक्ष
पंचायत समिती दाखल झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी घेतलेल्या आक्रमक पवित्र्याची चर्चा लगेचच व्हायरल झाली. समितीचा मूड गरमा-गरम असल्याने बुधवार आणि गुरूवारपर्यंत कोणावर कारवाईची कुºहाड कोसळते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ही समिती ऐन वेळी कुठल्या कामांना भेटी देणार हे ठरवत असल्याने सध्या जिल्हा परिषदेअंतर्गत येणा-या विभागप्रमुखांसह कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे. गाव पातळीवर या समितीच्या दौºयाची तयारी करण्यात आली आहे.
दोन ग्रामसेवक निलंबित
घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील विहीर, पाईपलाईन इ. कामांमध्ये निकष डावलून ती कामे केली. त्यातील काही कामे तर न करताच त्याची लाखो रूपयांची देयके उचलली आहेत. या मुद्यावर प्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्यासह अन्य अधिकाºयांनी याची चौकशी केली होती. मंगळवारी पंचायत राज समिती येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामसेवक एम.बी. तोटे आणि बी.एल.लहाने यांच्यावर ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.