तुल्यबळ उमेदवारांसाठी पॅनल प्रमुखांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:25 AM2020-12-25T04:25:00+5:302020-12-25T04:25:00+5:30
धावडा ग्रामपंचायतीत १७ सदस्य आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून अनेकजण तुल्यबळ उमेदवार आपल्या पॅनलमध्ये रहावेत, यासाठी प्रयत्नशील आहेत. पूर्ण ...
धावडा ग्रामपंचायतीत १७ सदस्य आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून अनेकजण तुल्यबळ उमेदवार आपल्या पॅनलमध्ये रहावेत, यासाठी प्रयत्नशील आहेत. पूर्ण उमेदवार फिक्स झाल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. आरक्षित जागेवर जात पडताळणीचे प्रमाणपत्र प्राप्त सदस्यांचाही गावात वाणवा आहे. आरक्षित जागेवर तुल्यबळ उमेदवारही काही पॅलनचे अजून निश्चित झालेले नाहीत. धावडा येथे तीन पॅनल व काही अपक्ष आपापल्या सोयीच्या वाॅर्डात उभे राहण्याची शक्यता असून, या वेळच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे दिसत आहे. काही आजी-माजी व नवीन उमेदवारही ही ग्रामपंचायत निवडणूक लढण्यास प्रयत्नशील असून, आपल्याला पॅनलमध्ये संधी मिळावी, यासाठीही अनेकांची धडपड सुरू आहे. सध्या तुल्यबळ उमेदवारांच्या शोधात पॅनल प्रमुख दिसत आहेत. दरम्यान, धावडासह परिसरातील पोखरी-मेहगाव ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. भोरखेडा ग्रामस्थांनी बिनविरोध निवडणुकीसाठी बैठक बोलावली होती; परंतु काही ग्रामस्थ बैठकीला उपस्थित न झाल्याने बिनविरोधाची प्रक्रिया होऊ शकली नाही.
प्रस्तावावर पाणी
विझोरा येथे सात सदस्यीय ग्रामपंचायतीचे सरपंचपद एससी महिलेसाठी राखीव निघले होते. त्याकरिता एका गटाचे तीन व दुसऱ्या गटाचे तीन उमेदवार बिनविरोध घ्यावेत, आरक्षित जागेच्या महिलेसाठी एससी मागासवर्गीय समाजाची बैठक बोलावून त्यांनी एका महिलेचे नाव द्यावे व त्यांच्यात एकमत न झाल्यास त्या एका जागेची निवडणूक घ्यावी, असा प्रस्ताव समोर आला होता. मात्र, आरक्षण रद्द झाल्याने या प्रस्तावावर पाणी पडले.