पप्पा,आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही, वैभवी देशमुखच्या डोळ्यात अश्रुधारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 15:41 IST2025-01-11T15:32:31+5:302025-01-11T15:41:26+5:30
जालन्यात एकवटले सर्वधर्मीय : प्रकरण फास्टट्रॅकवर चालवा, आरोपींना कठोर शिक्षा करा

पप्पा,आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही, वैभवी देशमुखच्या डोळ्यात अश्रुधारा
जालना : माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली त्यांना एकच प्रश्न विचारते. का तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून मारले. त्यांना त्यावेळी किती वेदना झाल्या असतील. त्याचे उत्तर मला हवे आहे. आज माझे पप्पा माझ्यासोबत नाहीत याची मला खंत वाटते. पप्पा तुम्ही आज जिथे कुठे असाल तिथे आजपर्यंत जसे हसत राहिला तसेच हसत राहा आणि आम्हा देशमुख कुटुंबाला माफ करा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही, अशी खंत वैभवी देशमुख हिने व्यक्त करताच उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी तरळले होते.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि दोन्ही कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी मराठा सेवा संघाच्या पुढाकारातून शुक्रवारी दुपारी जालन्यात सर्वधर्मीय जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात वैभवी देशमुख हिने आपल्या कुटुंबावर आलेल्या कटू प्रसंगाची माहिती देतानाच आम्हाला न्याय द्यावा, अशी सादर सरकारकडे घातली. जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून अंबड चौफुलीपर्यंत हा जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, खा. कल्याण काळे, ॲड. ब्रह्मानंद चव्हाण यांच्यासह सर्व समाजातील प्रतिनिधी, समाज बांधवांची उपस्थिती होती. अंबड चौफुलीवर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी, समाजसेवकांनी आपल्या भाषणातून आरोपींचा आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. मस्साजोग आणि परभणी येथील घटनेचा निषेध नोंदवित आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, सर्वच आरोपींना अटक करावी, प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवावे, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी यासह इतर मागण्या लावून धरल्या होत्या. सभेचे प्रास्ताविक सुनील आर्डद यांनी तर अरविंद देशमुख आणि यांनी सूत्रसंचालन आणि देवकर्ण वाघ यांनी आभार प्रदर्शन केले. शेवटी डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जरांगे पाटील बसले सर्वसामान्यांत
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे ही या जनाक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चानंतर जरांगे पाटील सभास्थळी सर्वसामान्यांत जाऊन बसले. तब्येत खराब असल्याने जरांगे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले नाही. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हस्तेच्या निषेधार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चात कोणीही राजकीय भाषण करणार नाही तसेच कोण्या नेत्याला आणि समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करू नये अशा प्रकारचे आवाहन केले होते.