एसटीच्या रातराणीसह ट्रॅव्हल्सला प्रवाशांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:39 AM2021-06-16T04:39:56+5:302021-06-16T04:39:56+5:30
जालना : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यातील कोरोनाची रूग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे नागरिक प्रवास करीत असून, एसटी ...
जालना : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यातील कोरोनाची रूग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे नागरिक प्रवास करीत असून, एसटी महामंडळाच्या रातराणी बसेसह ट्रॅव्हल्सला आता चांगला प्रतिसाद मिळत आहेत. त्यामुळे ट्रॅव्हल्ससह रातराणी बसेसमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे शासनाला ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लागू करावे लागले. या काळात एसटीसह ट्रॅव्हल्स बंद होत्या. आता रूग्णसंख्या कमी झाल्याने शासनाने अनलॉक जाहीर केले आहे. सर्व व्यवहार सुरू झाले असून, बस व ट्रॅव्हल्स सुरू झाल्या आहेत. अनलॉक होताच, नागरिकही मोठ्या प्रमाणात प्रवास करीत आहेत.
सध्या बसेस व ट्रॅव्हल्स सुरू झाल्यामुळे सध्या प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकंदर एसटी महामंडळ व ट्रॅव्हल्स चालकांना चांगले दिवस आले आहे. जिल्ह्यात सध्या एसटी महामडंळाच्या ३१४ फेऱ्या होत आहेत. तर तीन रातराणी बसेस सुरू आहे. यात जालना-कोल्हापूर, परतूर -मुंबई आणि जालना -पुणे अशा महामंडळाच्या रातराणी बसेस सुरू आहेत. तिन्ही मार्गांवर चांगला प्रतिसाद मिळत असून, दिवसाला महामंडळाला ५० ते ६० हजार रूपयांचे उत्पन्न मिळत आहे. दुसरीकडे ट्रॅव्हल्समध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे.
टॅव्हल्सचे तिकीट जास्त, तरीही गर्दी
चार महिन्यानंतर ट्रॅव्हल्स सुरू झाल्या आहेत. मध्यंतरी म्हणजे फेब्रुवारी ते मे या दरम्यान कोरोना महामारीमुळे ट्रॅव्हल्स बंद होत्या. आता ट्रॅव्हल्स सुरू झाल्या असून, प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जे लोक लाॅकडाऊनच्या काळात पुणे, मुंबई, नागपूर या शहरांतून परत आले आहे, ते आता परत पुणे, मुंबईकडे जात असून, प्रवाशासाठी ते ट्रॅव्हल्सला पसंती देत आहे.
ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचे दरही पूर्वीप्रमाणेच असून, त्यात काहीही वाढ झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
कोरोनाचे नियम पाळले जात आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढीनंतर तिकीट दरात वाढ झाली नाही.
महामंडळाने कोल्हापूर, मुंबई आणि पुणे या रातराणी बसेस सुरू केल्या आहेत. आजमितीस तरी या रातराणी बसेसेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना महामारी ओसरत चालली असली तरी कोरोनाचे नियम मात्र पाळले जात आहेत. प्रवाशाला मास्क असेल तर एसटी बसेसमध्ये प्रवेश दिला जात आहे. चालक, वाहकाला ही मास्कबाबत सूचना केली जात आहे. सध्या सर्वच बसेस सुरू झाल्या आहेत. प्रवाशांनी एसटीने प्रवास करावा. शिवाय, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.
- प्रमोद नेहूळ, विभाग नियंत्रक , जालना
पुणे, मुंबई मार्गावर गर्दी
महामंडळाकडून जालना- कोल्हापूर, परतूर-मुंबई व जालना -पुणे या रातराणी बसेस सुरू केल्या आहेत. यातील पुणे व मुंबई मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मध्यंतरी कोरोनामुळे एसटी बसेस बंद होत्या. त्यामुळे महामंडळाला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला होता. आजमितीस रातराणी सुरू झाल्यामुळे महामंडळाचे उत्पन्न वाढले.