बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:26 AM2019-05-30T01:26:20+5:302019-05-30T01:27:20+5:30
ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकिय अधीक्षकाचे पद रिक्त झाले असून, या रूग्णालयात अनेक असुविधा असल्यामुळे रूग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : येथील ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकिय अधीक्षकाचे पद रिक्त झाले असून, या रूग्णालयात अनेक असुविधा असल्यामुळे रूग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शहर व तालुक्यातील सर्वसामान्य व गरीब जनतेला कमी खर्चात रोगनिदान व औषधी उपचार होण्यासाठी शासनाने तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रूग्णालयाची सुरूवात केली. त्यानंतर या रूग्णालयातील विविध विभागांसाठी व डॉक्टर कर्मचा-यांच्या निवासस्थानांसाठी कोटयवधी रूपये खर्च करून स्वतंत्र अशी भव्य इमारत व निवासस्थाने उभारली आहेत. या ग्रामीण रूग्णालयात एक वैद्यकीय अधिक्षक, ३ वैद्यकीय अधिकारी, एक सहायक अधीक्षक, दोन कनिष्ठ लिपिक, ७ अधिपरिचारिका,एक प्रयोग शाळा तंत्रज्ञ व एक सहायक, एक क्षकिरण तंत्रज्ञ, एक औषध निर्माता, एक शिपाई, चार कक्षसेवक, दोन सफाई कामगार अशी एकुण २५ पदे मंजूर असतांना यापैकी एक वैद्यकिय अधिक्षक,एक कक्षसेवक,एक शिपाई,एक सफाई कामगार अशी चार पदे रिक्त असुन २१ पदे भरलेली आहेत, यातील दोन, चार कर्मचारी वगळता सर्व डॉक्टर व कर्मचा-यांना येथील शासकीय निवासस्थानांचीही सुविधा दिलेली आहे.असे असताना येथे येण्यास कोणीच उत्सुक नसल्याने हे रूग्णालय म्हणजे रेफर रूग्णालय म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
ओपीडीची वेळ वाढविण्याची मागणी
सध्या ओपीडीची सकाळी ९ ते १२.३० ते सायंकाळी ४ ते ५ अशी वेळ आहे. मात्र कडक उन्हाळा असल्याने दुपारच्या वेळेत रूग्णांना ग्रामीण रुग्णालयात येण्यास अडचण येते. यामुळे ओपीडीच सकाळची वेळ १२.३० ऐवजी २ वाजेपर्यंत करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
अपडाऊन बनले डोकेदुखी
४या ग्रामीण रूग्णालयाचे अंतर हे शहरापासून तीन ते चार किलोमीटर दूर आहे. त्यामुळे येथे रूग्णांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. तसेच अनेक डॉक्टर हे बदनापूरमध्ये राहत नसल्याने रूग्णांसाठी ही एक मोठी डोकेदुखी ठरत आहे. याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष देण्याची गरज रूग्णांकडून व्यक्त होत आहे.