आज देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:49 AM2019-08-13T00:49:01+5:302019-08-13T00:50:08+5:30
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लोकमत टाईम्स कॅम्पस क्लबतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
जालना : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लोकमत टाईम्स कॅम्पस क्लबतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाही ही स्पर्धा होणार असून, आज मंगळवारी शहरातील अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल येथे सकाळी १० ते १ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा आंतरशालेय असून, फक्त शाळेमार्फतच समूह सहभागी होऊ शकतात. प्रत्येक शाळेचा केवळ एकच समूह गायनासाठी सहभागी होऊ शकतो. समूहामध्ये कमीत कमी १० व जास्तीत जास्त २० विद्यार्थी असणे अपेक्षित आहे. गायन स्पर्धेसाठी लागणारे वाद्य व वादक शाळेने स्वत: आणायचे असून, कोणत्याही भाषेतील गाणे चालणार आहे. गायनासाठी ५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. या व्यतिरिक्त वाद्यवृंदांच्या तयारीसाठी २ मिनिटाचा वेळ देण्यात येईल. भाग घेतलेल्या ग्रुपने वेळेच्या एक तास आधी शाळेच्या समन्वयक शिक्षकांसह उपस्थित राहणे अपेक्षित आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल व समूह गायन स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय असे बक्षीस हे शाळेला देण्यात येईल. या व्यतिरिक्त दोन उत्तेजनार्थ बक्षीस राहील. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कॅम्पस क्लबतर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळेने मंगळवारी सकाळी वेळेत विद्यार्थी समूहासह कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून शाळेची नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल, श्रीनिवास डेकोरेशन, ओंकार डिजिटल ग्राफीक्स यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.