पावणेदोन लाख घेऊन नववधू झाली पसार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 05:29 AM2017-08-17T05:29:50+5:302017-08-17T05:29:52+5:30
पावणेदोन लाखांचे दागिने आणि नोंदणी शुल्क घेऊन वधू-वर सूचक केंद्र चालकाच्या मदतीने तिने विवाह केला.
बदनापूर (जि. जालना) : पावणेदोन लाखांचे दागिने आणि नोंदणी शुल्क घेऊन वधू-वर सूचक केंद्र चालकाच्या मदतीने तिने विवाह केला. हात नाही लावायचा, म्हणत तीन दिवस नखरे दाखविले आणि रात्री साडीच्या आधाराने गच्चीवरून पसार झाली. ही एखाद्या चित्रपटाची कथा नव्हे, तर हिवरा येथे हा प्रकार घडला असून याप्रकरणी वधू-वर सूचक केंद्र चालकासह तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जालना तालुक्यातील हिवरा येथील अठ्ठावीस वर्षीय युवकाने लग्नासाठी स्थळ मिळावे याकरिता तालुक्यातील कंडारी बु. येथील खाडे वधू-वर सूचक केंद्राशी संपर्क साधला. कुठल्याही जाती-धर्माची मुलगी असली तरी चालेल, असे त्याने वधू-वर सूचक केंद्र संचालकास सांगितले व तशी नोंदही त्याच्याकडे केली. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांनी या केंद्राकडून त्यांना बोलावण्यात आले. लवकरच स्थळ सुचविण्यात आल्याने तो ‘देवच पावला’ या भावनेने लगबगीतच आपल्या आई-वडिलांसह कंडारी येथे गेला. तेथे सातपूर (जि. नाशिक) येथील एक मुलगी बघितली. मुलगी पसंद असल्याचे त्यांना सांगिंतले. त्यानंतर केंद्र चालकाने एक लाख साठ हजार रुपये शुल्क आणि वधूच्या अंगावर २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घालावे लागतील असे सांगितले. वर पक्षाने तयारी दर्शविली.