जालन्याच्या प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे; वाहनधारकांना करावी लागते कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 02:34 PM2018-07-06T14:34:28+5:302018-07-06T14:35:41+5:30
शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने जालनेकरांचा प्रवास खडतर झाला आहे. परिणामी, दररोज किरकोळ अपघात होत आहेत.
जालना : शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने जालनेकरांचा प्रवास खडतर झाला आहे. परिणामी, दररोज किरकोळ अपघात होत आहेत. यातील काही रस्त्यांची कामे एक वर्षापूर्वीच झाली आहे. त्यामुळे केलेला खर्च वाया गेल्याचे बोलले जात आहे. एकूणच या खड्डेमय प्रवासाला जालनेकर वैतागले आहेत.
जालना शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. शहरात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, न्यायालय आदीं महत्वाची शासकीय कार्यालये आहेत. शिवाय मराठवाड्यातील मोठे बाजारपेठ अशी ओळख आहे. यामुळे शहरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. संपूर्ण जिल्ह्यातून नागरिक विविध कामासाठी शहरात येतात. परंतू, शहरात प्रवेश करणाºया मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पहिल्याच पावसात बहुतांशी रस्ते उखडले गेले आहेत. विशेष म्हणजे हे रस्ते गेल्या वर्षीच तयार करण्यात आले. परंतू, हे ही रस्ते काही ठिकाणी उखडले आहेत. चांगल्या दर्जाचे होत नसल्याने एका वर्षांतच त्या रस्त्यांची दुरवस्था होत आहे. पुढील तीन महिन्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रस्त्यांवर लाखो रुपये खर्चूनही नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत असल्याने नाराजी आहे. रस्ते सुस्थितीमध्ये राहावेत यासाठी विविध राजकीय पक्षांनी विविध संघटनांनी मोर्चे व आंदोलने केली होती. त्यामुळे जालना शहरातील काही रस्ते सुस्थितीत करण्यात आले. परंतू, पहिल्याच पावसात रस्त्यांची दुरवस्था झाल्याने बांधकाम विभागाच्या कामांची पोलखोल झाली आहे.
सध्याच्या घडीला शिवाजी महाराज चौक ते गुरुबचन चौकाकडे जाणारा रस्ता. गांधी चमनपासून रेल्वे स्थानकाकडे जाणारा मार्ग, गांधी चमन ते मोतीबाग या सिमेंट रस्त्यावरही जागोजागी खड्डे पडले आहेत. तसेच अंबडकडे जाणाºया रस्त्यावरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. तसेच जिल्हा रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंतच्या रस्त्याची स्थिती अशीच आहे. परिणामी वाहनाधारकांना वाहने चालवतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकंदरीत जालनेकरांचा खड्डेमय प्रवास अद्याप तरी संपण्याच्या मार्गावर नाही. याकडे लोक प्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
वाहन चालविणे जिकिरीचे
शहरातील महावीर चौक ते अलंकार टॉकीजपर्यंतचा रस्ता खराब झाला आहे. परिणामी, वाहनधारकांना याचा त्रास होत आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या रस्त्याच्या दुतर्फा नालीचे काम करण्यात आले आहे. परंतू, हा रस्ता कधी होईल याची प्रतिक्षा नागरिकांना लागलेली आहे. अलंकार चौक ते मोती मशीद हा रस्ताही अत्यंत खराब आहे. या रस्त्यावरून पायी चालणेही अवघड आहे.
विशाल कॉर्नर ते भोकरदन रस्त्याचे काही महिन्यापूर्वीच डांबरीकरण करण्यात आले. त्या रस्त्यावरही खड्डे होण्यास सुरूवात झाली आहे.
खड्डे बुजविणार
या संदर्भात न.पचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, हे खड्डे लवकरच बुजविण्यात येणार आहे.