पवारांच्या दौऱ्यामुळे राकाँला मिळणार बळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:22 AM2019-09-20T00:22:13+5:302019-09-20T00:22:33+5:30
जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वस्वी मदार ही आ. राजेश टोपे यांच्यावरच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राष्ट्रवादी काँग्रेसचे जालन्यावर २००४ मध्ये वर्चस्व होते. तीन आमदार याच पक्षाचे होते. मात्र, नंतर या वर्चस्वाला युतीने धक्का दिल्याने आज घनसावंगी मतदार संघातच थोडेफार राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तीत्व दिसते. माजी आ. चंद्रकांत दानवे हे देखील तीन वेळेस आमदार राहिले. ते भाजपच्या बालेकिल्लयात राहून खा. रावसाहेब दानवेंना टक्कर देण्याचा प्रयत्न करता, परंतु ते एकटेच खिंड लढवत असल्याने त्यांना मर्यादा येतात. जालन्यातही राष्ट्रवादीचे अस्तीत्व हे जमेतेमच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वस्वी मदार ही आ. राजेश टोपे यांच्यावरच आहे.
मध्यंतरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ येते तथा माजी खा.अंकुशराव टोपे यांच्या संघटन कौशल्यातून जिल्ह्यात राष्ट्रवादीचा दबदबा होता. त्यांनी सहकार, शिक्षण तसेच शेती आणि अन्य विकास संस्थांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर विकासाचे राजकारण केले. त्यांना त्यात यशही आले. राजकारण करत असतांना त्यांचा खमक्या स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा सर्वांना ज्ञात असल्याने त्यांचा एक प्रकारे दराराच होता. आता ते हयात नाहीत, त्यामुळे देखील पक्ष विस्तारावर मर्यादा येत आहेत.
मध्यंतरी राष्ट्रवादीचे आमदार राहिलेले अरविंद चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केला होता, परंतु ते आता स्वगृही परतले आहेत. त्यामुळे जालन्यात मोठा आधार मिळणार आहे. जालना नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी देखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. जाफराबाद तालुक्यातील माजी सभापती राजेश चव्हाण यांनी राकॉला जय महाराष्ट्र केला आहे.
आज शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा अंबड मार्गावरील मातोश्री लॉन्स येथे होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थितींमध्ये आ. राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख, माजी आ. अरविंद चव्हाण, चंद्रकांत दानवे, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी, जि.प.चे उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. ब-याच कालावधीनंतर शरद पवार हे जालना दौºयावर येत असल्याने त्यांच्या या दौºयाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. मेळाव्याच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गावोगाव संपर्क अभियान राबवून जास्तीत जास्त कार्यकर्ते उपस्थित ठेवण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांचे निवेदन तयार केले असून, हे निवेदन शरद पवारांकडे देण्यात येणार आहे. जणेकरून शेतकरी तसेच अन्य महत्त्वाच्या बाबींकडे शरद पवार हे लक्ष वेधून शकतील.