वरूडचे शेतकरी मदतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:26 AM2020-02-10T00:26:04+5:302020-02-10T00:26:19+5:30
वारंवार पाठपुरावा करूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यातील वरूड (बु.) येथील पाझर तलावाचा सांडवा परतीच्या पावसाने फुटला होता. यात शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही.
गतवर्षी पावसाळ्याच्या अंतीम टप्प्यात तालुक्यात जोरदार पाऊस झाला होता. यात लहान-मोठे तलाव भरले होते. वरूड (बु.) येथील जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचा पाझर तलाव क्र.- २ सुध्दा पूर्ण क्षमतेने भरला होता. मात्र, तलावाचे बांधकाम करताना सांडवा केवळ कागदोपत्री केल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात सांडवाच काढण्यात आला नव्हता. त्यामुळे पाझर तलावाचा सांडवा फुटून शेतकरी दीपक वाघ यांच्यासह अनेक शेतक-यांच्या शेतात पाणी घुसले होते. यात दीड ते दोन एकर जमीन वाहून गेली होती. आजही या ठिकाणी केवळ खडक शिल्लक आहे. तलाठ्यांनी पंचनामा करून अनेक दिवस झाले. मात्र, सतत पाठपुरावा करूनही नुकसानग्रस्त शेतक-यांना अद्याप एकही रूपयाची मदत मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.
याबाबत लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सुरेश गुठे म्हणाले, वरूड (बु.) येथील पाझर तलावाचा सांडवा फुटून शेतक-यांच्या शेतात पाणी गेले होते. यात संबंधित शेतक-यांच्या शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. याचा अहवाल तहसील कार्यालयात सादर केलेला आहे.