नांदी येथे पुन्हा गारगोटीची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 01:25 AM2020-01-02T01:25:31+5:302020-01-02T01:25:41+5:30
अंबड तालुक्यातील नांदी येथील गावात रविवारी मध्यरात्रीच्या वेळी गारगोटी उत्खनन केल्याची घटना समोर आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जामखेड : अंबड तालुक्यातील नांदी येथील गावात रविवारी मध्यरात्रीच्या वेळी गारगोटी उत्खनन केल्याची घटना समोर आली.
रोहिलागड महसूल मंडळातील नांदी येथील शेतकरी सय्यद अहमद महेताब यांच्या मालकीच्या गट क्र.११० क्षेत्र ०:४८ आर जमिनीमधून जे.सी.बी.च्या सहाय्याने अंदाजे दोन गुंठे क्षेत्रात गारगोटीचे अनधिकृत गौणखनिजाचे उत्खनन केल्याचे पंचनाम्यात आढळून आले. सदर उत्खननात अंदाजे दोन ते अडीच टन गारगोटी अज्ञात वाहनाने वाहतूक केली असून त्यांची किंमत अडीच ते तीन लाख असल्याचे पंचनाम्यात समोर आले. सदर पंचनाम्यावर पोलीस पाटील रामकिसन दगडू डोंगरे, सय्यद रिहाज निजाम, सय्यद जफर पटेल, अजीज लाला सय्यद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नांदी येथे दोन वर्षांपूर्वी महसूल प्रशासनाने अंदाजे एक कोटी पेक्षा जास्त रकमेची गारगोटी ताब्यात घेऊन. गारगोटीचे अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर मोठी दंडात्मक कारवाई केली होती.
परंतु काही काळानंतर संबंधित तस्करांनी पुन्हा एकदा अवैध गारगोटी उत्खनन करण्यास जोरदार सुरुवात केली.
तसेच सदर घटनास्थळी अंबडचे तहसीलदार राजीव शिंदे, मंडळाधिकारी एस.ए.गाडेकर, तलाठी पी.बी.शिनगारे, शेतकरी सय्यद अहमद यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.