पेन, पेन्सिलने होईल स्वसंरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:17 AM2019-08-20T00:17:22+5:302019-08-20T00:18:29+5:30
येणाऱ्या प्रसंगावर कणखरपणे मात करून मुलींनी ताठ मानाने उभे रहावे, यासाठी पोलीस दलांतर्गत कार्यरत दामिनी पथक प्रयत्न करीत आहे. स्वत:जवळ असलेल्या पेन, पेन्सिल, बॅगद्वारे मुलींनी स्वसंरक्षण कसे करावे, याचे धडे सोमवारी देण्यात आले.
जालना : येणाऱ्या प्रसंगावर कणखरपणे मात करून मुलींनी ताठ मानाने उभे रहावे, यासाठी पोलीस दलांतर्गत कार्यरत दामिनी पथक प्रयत्न करीत आहे. स्वत:जवळ असलेल्या पेन, पेन्सिल, बॅगद्वारे मुलींनी स्वसंरक्षण कसे करावे, याचे धडे सोमवारी देण्यात आले. शहरातील तीन शाळांमधील १२०० मुलींनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतले.
शालेय, महाविद्यालयीन मुलींची छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथक कार्यरत आहे. शाळा- महाविद्यालय, खासगी शिकवणीच्या वेळेत हे पथक शहरात गस्त घालत असून, टवाळखोरांना चोप देत आहे. मुलींनी केलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन कारवाई केली जात आहे.
केवळ कारवाई करून थांबण्याऐवजी मुलींना कायद्याची माहिती व्हावी, मुलींनी स्वसंरक्षण करावे, यासाठीही या पथकाकडून प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सोमवारी शहरातील सेंट मेरी स्कूलच्या प्रांगणात १२०० मुलींना प्रशिक्षण देण्यात आले.
कुडो फाऊंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पथकप्रमुख पोउपनि पल्लवी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित टीमने मुलींनी स्वत:जवळ असलेल्या पेन, पेन्सिल, शालेय बॅगेसह इतर शालेय साहित्याद्वारे स्वत:चे रक्षण कसे करावे, याचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिले. सेंट मेरी स्कूलसह राष्ट्रीय हिन्दी विद्यालय, राष्ट्रीय इंग्रजी शाळेतील १२०० मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घेतले.
यावेळी दामिनी पथकातील पोकॉ एस. एम. खांडेभराड, ए. डी. साबळे, आर. एल. राठोड, यु. पी. साबळे, व्ही. एस. तायडे चंचल नोमालकर, राज नंदिनी चेके, धीरज गुप्ता, अजहर खान, सुमित भवर, रोहन सूर्यवंशी, गौरव आजगे, दत्ता पवार, निवृत्ती दिघे आदींची उपस्थिती होती.
स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण गरजेचे
स्पर्धेच्या युगात मुली शिक्षणात पुढे आहेत. त्याच प्रमाणे काळाची गरज ओळखून मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे आत्मसात करणे गरजेचे आहे.
दामिनी पथकाकडून राबविण्यात येणारा उपक्रम चांगला असून, शाळा, महाविद्यालय स्तरावरूनही मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी यावेळी केले.