मॉब लिंचिंग प्रकरणी बदनापूर शहरात नागरिकांची निषेध रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:44 AM2019-07-10T00:44:39+5:302019-07-10T00:44:57+5:30
झारखंड राज्यात मॉब लिंचिंगद्वारे तरबेज अन्सारी यांची हत्या करणा-यां विरूध्द कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी शहरातून मुस्लिम समाजाच्या वतीने रॅली काढण्यात आली
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : झारखंड राज्यात मॉब लिंचिंगद्वारे तरबेज अन्सारी यांची हत्या करणा-यां विरूध्द कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी शहरातून मुस्लिम समाजाच्या वतीने रॅली काढण्यात आली
सदरील निषेध रॅली मंगळवारी सकाळी मिनारा मस्जीद पासून सुरू होऊन शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आली या रॅलीत तरबेज अन्सारी यांच्या मारेक-यांना फाशी देण्याच्या घोषणा देण्यात आल्या़ यावेळी रॅलीतील युवकांच्या हातात विविध मागण्यांचे फलक व बॅनर होते़ ही रॅली मिनारा मस्जीद, जालना-औरंगाबाद महामार्ग, बाजार गल्ली मार्गे ईदगाह मैदानावर आली तेथे झारखंड राज्यात झालेल्या मॉब लिंचिंगद्वारे केलेल्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध करून अनेकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़यावेळी मुस्लिम बांधवांसह सर्व समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
तसेच यावेळी शहरातील पोलीस ठाण्यात व तहसील कार्यालयात राष्ट्रपतींच्या नावे एक निवेदन देण्यात आले त्यात झारखंड राज्यात मुस्लिम समाजातील युवक तरबेज अन्सारी यांची हत्या करण्यात आली होती.
या घटनेतील संबंधित आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, हा प्रकार देशाला हादरवून टाकणारा असल्याने अल्पसंख्याक समाजात भीती व्यक्त होत आहे. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी राष्ट्रपतींनी याची दखल घ्यावी यासह अन्य मागण्यांचा समावेश होता.
या निवेदनावर हाफिज जावेदखान, महंमदखान पठाण, मौलाना शेख अयुब, मौलाना हारून पठाण, मौलाना शेख अख्तर, मौलाना शेख रईस, मौलाना महेमूदखान पठाण, मौलाना जुबेर पठाण आदींची नावे आणि स्वाक्ष-या आहेत़
या रॅलीला अनेक राजकीय पक्ष व संघटनांनी व पदाधिका-यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला होता. यावेळी मोठा बंदोबस्त होता.