जालना-वडीगोद्री मार्गासाठी याचिका दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:15 AM2017-11-22T00:15:45+5:302017-11-22T00:15:53+5:30
जालना-वडीगोद्री रस्त्याच्या दुरवस्थेविषयी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जालना-वडीगोद्री जनआंदोलन समितीने जनहित याचिका दाखल केली आहे
अंबड : जालना-वडीगोद्री रस्त्याच्या दुरवस्थेविषयी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जालना-वडीगोद्री जनआंदोलन समितीने जनहित याचिका दाखल केली आहे. या मार्गाच्या दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातांत २८९ नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याने याप्रश्नी आम्ही जनहित याचिका दाखल केली असल्याचे समितीचे संयोजक अॅड. किशोर राऊत यांनी सांगितले.
जालना-वडीगोद्री हा रस्ता जालना जिल्ह्याला दक्षिणेकडील राज्यांशी जोडणारा प्रमुख रस्ता आहे. मात्र दुरवस्था पाहता याला राज्य महामार्ग कसे म्हणावे, असा प्रश्न पडतो. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात नित्याचेच झाले आहेत. अंबड व घनसावंगी या दोन्ही तालुक्यांना जालना, औरंगाबाद, बीड व इतर शहरांना जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, चौपदरीकरण करावे या मागणीसाठी आतापर्यंत दोन्ही तालुक्यांतील जनतेने अनेक आंदोलने केली. मात्र, शासन व प्रशासनाला अद्यापपर्यंत काहीही फरक पडलेला नाही.
विशेष म्हणजे भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी दोन आठवड्यांपूर्वी या रस्त्याचे नूतनीकरण होणार असल्याचे तालुक्यातील शहापूर येथे जाहीर केले. मात्र केवळ आठवडाभरातच सा. बां. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्याचे नूतनीकरण नव्हे, तर सुदृढीकरण होणार असून त्यासाठी केवळ २५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. यामुळे जनतेच्या संशयकल्लोळात भर पडली आहे.
विविध आंदोलनांनंतर कंटाळलेल्या जनआंदोलन समितीने या प्रश्नी जनहित याचिका दाखल केल्याने आता तरी या रस्त्याचे भाग्य उजळेल का, असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आहे.