फुले यांचे विचार जगण्याची नवी प्रेरणा देणारे - डॉ. विनायक पवार - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:30 AM2021-04-16T04:30:17+5:302021-04-16T04:30:17+5:30
जालना : समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी महात्मा जोतिबा फुले यांचे योगदान हे मोलाचे असून, त्यांचे कार्य हे समाजाला प्रेरणादायी तर ...
जालना : समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी महात्मा जोतिबा फुले यांचे योगदान हे मोलाचे असून, त्यांचे कार्य हे समाजाला प्रेरणादायी तर त्यांचे विचार हे जगण्याची नवी प्रेरणा देणारे आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध गीतकार व कवी प्रा. डॉ. विनायक पवार यांनी केले.
जालना तालुक्यातील तांदूळवाडी येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. लोकगायिका कडूबाई खरात, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रदेश सरचिटणीस प्रमोदकुमार रत्नपारखे, सामाजिक कार्यकर्ते व भीमशक्तीचे मराठवाडा कार्याध्यक्ष सुधाकर निकाळजे, सरपंच अण्णासाहेब चित्तेकर, समता शिक्षण परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष म्हसके आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. पवार पुढे म्हणाले, तत्कालीन समाजाला प्रबोधन व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी महात्मा फुले यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. मुलींसाठी पहिली शाळा काढून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला, बालविवाहास विरोध करून विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. विधवा केशवपन करण्यास विरोध केला, आपल्या पुस्तके व वृत्तपत्राच्या माध्यमातून अस्पृश्य समाजाचे प्रबोधन केले. वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था या समाजाचे शोषण करणाऱ्या असून जोपर्यंत त्या नामशेष होत नाही तोपर्यंत एक समाजनिर्मिती होणे शक्य नाही, असे त्यांना वाटत होते, म्हणूनच जातीव्यवस्था निर्मूलन आंदोलनाचे ते प्रणेते ठरले आहेत. महात्मा फुले यांचे विचार जगण्याची नवी प्रेरणा देणारे आहेत, असेही ते म्हणाले.
या वेळी भीमशक्तीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रोहिदास गंगातिवरे, भीमशक्तीचे जिल्हा सरचिटणीस दिलीप शिंदे, भीमशक्तीचे जिल्हा कार्याध्यक्ष सतीश वाहुळे, जिल्हा सचिव अरुण सोनवणे, जालना शहराध्यक्ष किशोर बोर्डे, राजू सलामपुरे, आशिष चव्हाण, अंकुश वेताळ, अनिल झोटे, प्रकाश वाघ, ओंकार गायकवाड, राहुल भालेराव, तेजराव सपकाळ, सविता नवगिरे, दीपक दांडगे आदींची उपस्थिती होती.