तूर खरेदीला मुहूर्त लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:23 AM2019-02-17T00:23:18+5:302019-02-17T00:26:32+5:30
हमीभावाने तूर विक्रीसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील तीन केंद्रांवर फक्त ७७ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. मात्र, अद्यापही तूर खरेदी सुरू झाली नसल्याने नोंदणी केलेले शेतकरी हैराण झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हमीभावाने तूर विक्रीसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील तीन केंद्रांवर फक्त ७७ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. मात्र, अद्यापही तूर खरेदी सुरू झाली नसल्याने नोंदणी केलेले शेतकरी हैराण झाले आहेत. खरेदीला कधी मुहूर्त लागणार, याकडे शेतक-यांचे लक्ष लागून आहे.
जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तुरीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. शासनाने तुरीला ५६७५ रूपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र खुल्या बाजारात तुरीला ६००० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने अनेक शेतक-यांनी हमीभावाच्या नोंदणीकडे पाठ फिरविली आहे.
यामुळे नोंदणीच्या सुरुवाती पासूनच केंद्रावर शुकशुकाट दिसून येत आहे. भोकरदन १, अंबड ६ आणि जालना ६० अशा फक्त ७७ शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. मात्र अद्यापही नाफेडने खरेदी सुरु केली नाही.
शासनाकडून विक्री केलेल्या मालाचे पैसे देण्यास विलंब होत असताना देखील काही शेतक-यांनी हमीभाव केंद्रावर नोंदणी केली आहे. दोन आठवडे झाले तरी अद्यापही तूर खरेदीला सुरुवात झाली नाही. शेतकरी हमीभाव केंद्रावर चकरा मारत असून खरेदी कधी सुरू करणार, अशी विचारणा करताना दिसत आहेत.