जालना जिल्ह्यात तूर खरेदी ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:00 AM2018-04-20T01:00:49+5:302018-04-20T01:00:49+5:30
नाफेडने तुरीची आॅनलाईन नोंदणी बुधवार पासून बंद केली. मात्र आधीच आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदीस नाफेडकडून नकार दिल्याने जिल्हयातील तूर खरेदीला ब्रेक लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नाफेडने तुरीची आॅनलाईन नोंदणी बुधवार पासून बंद केली. मात्र आधीच आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदीस नाफेडकडून नकार दिल्याने जिल्हयातील तूर खरेदीला ब्रेक लागला आहे. तब्बल ६ हजार नोंदणीकृत शेतकºयांची तूर खरेदी बाकी असतांना खरेद बंद केल्याने नोंदणीकृत शेतक-यांतून संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील जालना, अंबड, भोकरदन, परतूर, जाफराबाद, तीर्थपुरी, आष्टी, मंठा इ. आठ हमीभाव केंद्रावर साडेआठ हजार शेतक-यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली. त्यापैकी फक्त १८०० शेतक-यांची हमीभावाने तूर खरेदी केली आहे. मात्र तब्बल ६ हजार २०० शेतक-यांची अद्यापही तूर खरेदी करण्यात आली नाही. आधीच नाफेडने उशिराने जिल्ह्यात तूर खरेदी करण्यास सुरूवात केली. मात्र तूर ठेवण्यासाठी जागेच्या अडचणीमुळे जिल्ह्यात दोन वेळेस तूर खरेदी ठप्प झाली होती. १६ एप्रिल रोजी नाफेडने पत्र काढून जिल्ह्यातील १८ एप्रिल पासून आॅनलाईन नोंदणीसह तूर खरेदी बंद करण्याचे आदेश दिले. एकीकडे मोठ्या प्रमाणात शेतक-यांनी नोंदणी केली. मात्र जाणीवपूर्वक तूर खरेदी संथ गतीने केल्यानेच अद्यापही शेतक-यांची तूर खरेदी झाली नसल्याचा आक्षेप शेतक-यांनी केला आहे.