गावठी कट्टा; काडतूस जप्त, दोघा जणांना ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:59 AM2019-04-14T00:59:16+5:302019-04-14T01:00:18+5:30
रामनगर परिसरातील एका युवकाच्या घरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री छापा मारुन एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील रामनगर परिसरातील एका युवकाच्या घरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री छापा मारुन एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. नीलेश भिकाजी भिंगारे (२८) आणि त्याचा मित्र शेख अकिम शेख रहिम (२८) असे आरोपींचे नावे आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे. शुक्रवारी रात्री रामनगर येथील नीलेश भिकाजी भिंगारे याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती रात्री गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. त्यानूसार त्यांनी परिसरात सापळा लावून भिंगारे यास ताब्यात घेतले. पिस्तुलाविषयी माहिती विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच आपल्याकडे असलेले पिस्तूल आपला मित्र अकिम उर्फ अक्कू शेख रहिम याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना दिली.
गुन्हे शाखेच्या पथकाने भिंगारे याला सोबत घेऊन अकिब शेख याचा खरपुडी नाका परिसरात शोध घेत असतांना मंठा चौफुली येथून त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्तूल आणि खिशात एक जिवंत काडतूस (राऊंड) आढळून आले. दोघांना ताब्यात घेऊन सदर बाजार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. ज्ञानेश्वर सानप, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडधे, कृष्णा तंगे, तुकाराम राठोड, समाधान तेलंग्रे, अंबादास साबळे, सचिन चौधरी, मदनसिंग बहुरे, हिरामण फलटणकर, विष्णू कोरडे, वैभव खोकले, विकास चेके, मंदा बनसोडे, आशा जायभाये, सूरज साठे आदींनी केली.