जुन्या भांडणावरुन पिस्तूल रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:45 AM2018-11-11T00:45:17+5:302018-11-11T00:45:48+5:30
एक महिन्यापूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या रागातून दोघांनी प्लॉट विक्री एजंटाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर गावठी पिस्तूल रोखले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : एक महिन्यापूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या रागातून दोघांनी प्लॉट विक्री एजंटाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर गावठी पिस्तूल रोखले. याप्रकरणी दोघांवर पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
बीड येथील प्लॉट खरेदी-विक्री एजंट सय्यद शेर अली निसार अली यांचे पेठ बीड चौकातील राजू भाई बेकरी येथे शेख खदिर शेख जमीर उर्फ समी (रा. बारादरी मस्जिद जवळ, पेठ बीड) याच्यासोबत किरकोळ भांडण झाले होते. त्यावेळी काही लोकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता. काल गुरुवारी रात्री ९.४० वाजता सय्यद शेर अली मित्रासमवेत गांधीनगर भागात एका हॉटेलमध्ये चहा घेत बसले होते.
यावेळी शेख खदिर हा अन्य एका सोबत तिथे आला आणि सय्यद शेर अली यास जुन्या वादातून शिवीगाळ करत त्यांच्यावर गावठी कट्टा (पिस्तूल) रोखले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ते दोघेही नंतर बघून घेउत असे म्हणत दुचाकीवरून तिथून निघून गेले. याप्रकरणी शेख खदिर आणि एका अनोळखी व्यक्तीवर शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये पेठ बीड पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.