"मला जेलमध्ये टाकून जीवे मारायचा डाव"; मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 04:58 PM2024-07-24T16:58:18+5:302024-07-24T16:58:43+5:30
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतील महिलांच्या हाताने ज्यूस पिऊन उपोषण सोडले
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : सलाईनवर पडून राहण्यात उपयोग नाही, त्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं, या मतावर मी आलो आहे. येथे पडून राहण्यापेक्षा मी मतदार संघाची तयारी करेल. मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या आमदारांचा बंदोबस्त करायचा आहे, अशी भूमिका घेत मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्या दिवशी दुपारी १:३० वाजता उपोषण सोडले.
मराठा आरक्षणासाठी सूरू असलेल्या बेमुदत उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. या दरम्यान जरांगे पाटील यांना मध्यरात्री ३ सलाईन लावण्यात आल्या. त्यानंतर जरांगे यांनी आज पाचव्या दिवशी सकाळी उपोषण स्थगित करणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यानुसार दुपारी १:३० वाजता उपोषण स्थगित करून जरांगे छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रवाना झाले.
रात्री शुगर ५८ झाली, म्हणून त्यांचे म्हणणे आले धोका आहे. २० ते ३० जणांनी दाबून धरत मला सलाईन लावल. इथले लोक म्हंटले आरक्षण दोन चार महिने उशिरा भेटले तरी चालत, पण आम्हाला तुम्ही पाहिजेत इथला मंडप काढू, इथला खूपच विकास रखडलेला आहे. आपले पैठण फाटा येथे कार्यालय होत आहे. काही जणांना काही कळत नाही फक्त कुरापती करतात. भाजपच्या इथल्या नेत्याला मागे हल्ला होताना माहिती होत. माझी शक्तीच उपोषण, काही ना काही मी समाजाला आरक्षण देऊ शकलो. मराठा समाजाला मी ओबीसीमधून आरक्षण दिले, उद्या सरकारने मारले तरी माझं जीवन सार्थकी लागले. आता मी विविध भागातील रॅलीची तयारी करेल. सरकारचा जीव ज्यात आहे ती सत्तेची खुर्ची कशी धोक्यात येईल त्याच्यासाठी काम करेल. सलाईन घेऊन उपोषण करण्यात काही अर्थ नाही, सरकारची दमछाक होणार नाही. त्यामुळे मी त्या मतावर आलोय असेही जरांगे यांनी सांगीतले. तसेच मिडियातून मंत्री देसाई म्हंटले २ महिन्याचा आम्ही वेळ मागितला होता. दिला तुम्हाला १३ ऑगस्ट पर्यन्त वेळ, असेही जरांगे म्हणाले.
फडणवीस यांच्यावर आरोप, दरेकर यांना इशारा
देवेंद्र फडणवीस यांनी मला जेलमध्ये टाकून आतमध्ये मारायचे ठरवले असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. मी शंभूराजा सारखं मरायला भित नाही. फडणवीस यांना बांध फोडायची सवय लागलीय. फडणवीसांनी मुंडे, महाजन घराणे संपवले. मुंडेच्या बोटाला धरून हे मोठे झाले यांनी कित्येक घराण्यांचे वाटोळं केलं. तसेच मला जरा चांगलं होऊ द्या, कोण कसं दिसतं कोणासारख दिसत हे सांगेन. ठाणे मतदार संघात वार्ड क्रमांक २५ वर कशामुळे प्रेम आहे? बँकेचं काय आहे हे मी सांगतो. मी कोणाच्या वैयक्तिक जीवनात पडत नाही. माझ्या नादी लागू नका, असा इशारा जरांगे यांनी आमदार दरेकर यांना दिला.
मी राजकारणात जाणार नाही
छत्रपती अडचणीत आणण्याची परंपरा खंडित नाही झाली पाहिजे, ती वंश परंपरा फडणवीस जपत आहे.
ज्यांनी घोटाळे केले त्यांना क्लीन चिट मिळते. हजारो कोटी घोटाळा करणाऱ्यांचं वॉरंट कॅन्सल होत. छत्रपतींचे महानाट्य दाखवलं गुन्हा केला का, असा सवाल जरांगे यांनी केला. २९ ऑगस्टला आम्ही ठरवणार २८८ जागा पडायच्या की उमेदवार उभे करायचे. राज्यातील सर्व मराठा एकत्र येणार, त्या दिवशी ठरवू. मी राजकारणात जाणार नाही असेही जरांगे म्हणाले.