प्लास्टिकमुक्तीचे स्वप्न धूसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 01:01 AM2018-07-15T01:01:58+5:302018-07-15T01:02:42+5:30
शासनाने प्लास्टिक बंदी लागू करुन २२ दिवस झाले. मात्र अद्यापही शहरात याची प्रभावीपणे अंमलबजावणी होतांना दिसून येत नसल्याने प्लास्टिक मुक्तीचे स्वप्न धुसर दिसू लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शासनाने प्लास्टिक बंदी लागू करुन २२ दिवस झाले. मात्र अद्यापही शहरात याची प्रभावीपणे अंमलबजावणी होतांना दिसून येत नसल्याने प्लास्टिक मुक्तीचे स्वप्न धुसर दिसू लागले आहे.
प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असल्याने शासनाने २३ जूनपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली. यामुळे शहरात सुध्दा याची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र आधीच सुस्त असलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी व्यावसायिकांवर वचक बसावा ऐवढीही कारवाई नाही. कडक अंमलबजावणी होऊन प्लास्टिक मुक्त जालना होईल, असे वाटले होते. मात्र २२ दिवस उलटूनही शहरात प्लास्टिकचा वापर कमी होण्यापेंक्षा अधिक वाढत असल्याचे दिसत आहे. शहरातील दुकाने असो वा पानटपरी येथे सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होत आहे. यामुळे शहर प्लास्टिकमुक्त होईल का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
प्लास्टिकचा घातक परिणाम लक्षात घेता प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत. मात्र, ही सूचना जालना नगरपालिकेने म्हणावी, तशी मनावर घेतलेली दिसत नाही. तसेच शहरातील व्यावसायिकांनी सुध्दा ही गांभिर्याने घेतली नाही. त्यांनी प्लास्टिकचा वापर सुरुच ठेवला आहे. अलिकडच्या काळात प्लास्टिकचा वापर दैनदिन व्यवहारातील अविभाज्य घटक बनला आहे. यामुळे प्लास्टिकचा वापर चांगलाच वाढलेला आहे. प्लास्टिक नष्ट होत नसल्याने याचे लोण शहरासह ग्रामीण भागात पसरले आहे. यामुळे प्रदूषणात वाढ होऊन मुक्या जनावरांना सुध्दा धोका निर्माण होत आहे. यामुळे शासनाने प्लास्टिक बंदीची घोषणा केली होती. आणि व्यावसायिक आणि वितरकांना आपल्याकडील साठवलेला प्लास्टिकचा साठा संपवून दुसरा व्यवसाय करण्यासाठी तीन महिन्याची मुदत दिली होती. तरी सुध्दा शहरातील प्लास्टिकचा साठा अद्यापही संपलेला नाही. उलट त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. एकीकडे पालिका प्रशासन २ टन प्लास्टिक पकडल्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र शहरात प्लास्टिकचा वापर सर्रासपणे वापर सुरु आहे.