पीएम किसानचा याच महिन्यात मिळणार हप्ता; अडचणी दूर करण्यासाठी गावागावात शिबिर
By महेश गायकवाड | Published: June 17, 2023 04:39 PM2023-06-17T16:39:23+5:302023-06-17T16:40:07+5:30
२० व २१ जून रोजी सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे.
जालना : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. कृषी आयुक्तांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात २० व २१ जून रोजी गावोगावी कृषी सहायकांमार्फत शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात लाभार्थी शेतकऱ्यांनी सहभागी होऊन योजनेतील स्थिती तपासून त्रुटीची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केले आहे.
२० व २१ जून रोजी सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे. या शिबिरात कृषी विभाग, आत्मा यंत्रणा, पोस्ट खाते, बँका तसेच सीएससी केंद्राचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. केंद्र शासनाने योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थीचे बँक खाते आधार संलग्न करणे, ई-केवायसी प्रमाणीकरण करणे या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. त्याशिवाय त्यांना योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही. राज्यात लाखो शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी संलग्नीत करणे व ई-केवायसी करणे प्रलंबित आहे. जालना जिल्ह्यात केवायसी न झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ६४ हजार ९९२ तर आधार लिंक न केलेल्यांची संख्या ३० हजार ९७५ आहे. या सर्व लाभार्थींची यादी कृषी सहायकांना वाटप करण्यात आली आहे. प्रत्येक गावात होणाऱ्या शिबिराबाबत नोटीस लावणे, दवंडी देणे तसेच व्हाॅट्सॲप ग्रुपवर प्रचार- प्रसिद्धी करण्यात येणार आहे.