गेला मव्हा जीव.. मले भिंतीला खुटवा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:44 AM2019-04-22T00:44:15+5:302019-04-22T00:44:35+5:30
गेला मव्हा जीव... मले भिंतीला खुटवा.... सोन्याचं पिंपळ पानं... माज्या माहेरी पाठवा... कवी नारायण पुरीच्या विरह स्वरातील कवितेच्या या आर्त हाकेने संपूर्ण वातावरण काही वेळ भावूक बनले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : गेला मव्हा जीव... मले भिंतीला खुटवा.... सोन्याचं पिंपळ पानं... माज्या माहेरी पाठवा... कवी नारायण पुरीच्या विरह स्वरातील कवितेच्या या आर्त हाकेने संपूर्ण वातावरण काही वेळ भावूक बनले होते. निमित्त होते डावरगाव देवी येथील जगदंबा देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेत आयोजित नक्षत्र काव्य मैफलीचे. शुक्रवारी रात्री येथील देवी मंदिराच्या भव्य प्रांगणात झालेल्या या काव्य मैफलीत प्रथमत:च ग्रामीण भागातील श्रोते मंत्रमुग्ध झाल्याचे पाहावयास मिळाले.
जालना जेईएस महाविद्यालयाचे डॉ. यशवंत सोनुने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या काव्य मैफिलीत कवी नारायण पुरी, कवयित्री संजीवनी तडेगावकर, समाधान इंगळे, कृष्णा वाघ या चार कवींनी एक से बढकर एक अशा कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
नारायण पुरीच्या प्रेमाचा जांगडगुत्ता व काटा या कवितांना तर श्रोत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.
तब्बल तीन तास चाललेल्या या काव्य मैफलीस सरपंच अनिल नवले, माजी सरपंच सुभाष नवले, शिक्षक नेते संजय लहाने, शाहीर कृष्णा इंगळे, विष्णू वराडे, सैलीप्रकाश वाघमारे, दिनकर ससाने, अलकेश सोमाणी, नसीम शेख, सुरेश बोर्डे, गोविंद जाधव, धनंजय निकम, दगडूबा देठे, सुखदेव नवले, दत्तात्रय देठे, प्रभू गाढे, गजानन नवले, साहेबराव नवले, समाधान नवले, दत्तू नवले, विष्णू नवले, प्रताप नवले, दीपक नवले, त्र्यंबक नवले, गणपत लोखंडे, योगेश देठे व श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.
संजीवनी तडेगावकर यांनी अस्सल ग्रामीण जीवनावर आधारित कविता सादर केल्या. जिवा लागे हुरहूर गोड स्वरात गायलेल्या या कवितेला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. कवी कृष्णा वाघ यांनी शेतकऱ्यांच्या जीवनाचं वास्तव सांगणारी कविता सादर केली. तर समाधान इंगळे यांनी गायलेल्या असेच डोळे मिटुनी ठेवले तर... तांबडं फुटणारच नाही.. या कवितेसह आपल्या उत्कृष्ट सूत्रसंचालनाने श्रोत्यांची वाहवा मिळविली.