विषबाधा झालेल्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:41 AM2019-10-04T00:41:45+5:302019-10-04T00:42:42+5:30
पिकावर फवारणी करताना विषबाधा झालेल्या एका ३३ वर्षीय युवक शेतक-याचा मंगळवारी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पिकावर फवारणी करताना विषबाधा झालेल्या एका ३३ वर्षीय युवक शेतक-याचा मंगळवारी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गत तीन महिन्यात पिकांवर फवारणी करताना न कळत ७४ शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी आस्मानी- सुलतानी संकटांचा सामना करीत आहे. यंदा अपु-या प्रमाणात पाऊस झाला असला तरी पीक वाढीच्या काळात कमी- अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने पिके चांगली आली. मात्र, रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक-यांनी महागडी औषधे फवारली. मात्र, ही पिके फवारताना आवश्यक ती दक्षता न घेतली गेल्याने गत तीन महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल ७४ शेतक-यांना न कळत विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यात आॅगस्ट महिन्यात ७, सप्टेंबर ५७ तर तर आॅक्टोबर महिन्यात २ शेतक-यांना न कळत विषबाधा झाली होती.
या बाधित शेतक-यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती अत्यवस्थ असलेल्या सहा जणांना सोलापूरला हलविण्यात आले होते. तर इतर शेतक-यांवर जिल्हा रूग्णालयात उपचार झाले असून, त्यांना वेळेत डिश्चार्ज देण्यात आला आहे.
अंबड तालुक्यातील ताड हदगाव येथील शेतकरी नामदेव महादेवराव खर्जुले (३३) यांनी रविवारी पिकावर औषध फवारणी केली होती. मात्र, रात्रीच्यावेळी त्यांना त्रास झाला. सोमवारी त्यांना अंबड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रथमोपचारानंतर त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. मयत शेतकºयाच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, कृषी विभाग जनजागृती करीत असला तरी ग्रामीण भागात प्रभावीपणे ही जनजागृती होत नसल्याचेच चित्र होणा-या विषबाधेवरून दिसून येते. विषबाधेच्या वाढणा-या घटना पाहता शेतक-यांनीही पिकांवर फवारणी करताना कृषी विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
ताड हदगाव येथील खर्जुले कुटुंबातील तीन भावंडांमध्ये केवळ अडीच एकर शेती आहे. या कुटुंबातील नामदेव यांचा औषध फवारणीनंतर न कळत झालेल्या विषबाधेने मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने या कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
कृषी अधिका-यांनी घेतली भेट
ताड हादगाव येथील बाधित शेतक-याचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच कृषी विभागाच्या अधिका-यांनी खर्जुले कुटुंबाची भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगण्यात आले. चर्चेचा अहवाल मात्र, रात्री उशिरापर्यंत समजू शकला नाही.