पोकलेनने जलवाहिनी निखळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 01:08 AM2020-01-19T01:08:18+5:302020-01-19T01:09:24+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पैठण रस्त्याचे रूंदीकरण करतांना पोकलेनचा धक्का लागल्याने जलवाहिनीतील काही पाईप निखळल्याने मोठी अडचण निर्माण झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पैठण रस्त्याचे रूंदीकरण करतांना पोकलेनचा धक्का लागल्याने जलवाहिनीतील काही पाईप निखळल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. या जलवाहिनीची दुरूस्ती युध्द पातळीवर हाती घेण्यात आली असून, या घटनेमुळे जुना जालना शहराला चार दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.
गेल्या महिन्याभरात जालना शहराला पाणीपुरवठा करणा-या जलवहिनी फुटण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वीही अशी गळती लागली होती. आता तर पोकलेनच्या धक्का लागल्याने जलवाहिनीचे पाईप निखळले आहेत. यामुळे मोठे पाणी वाया गेले. परंतु लगेचच जालना पालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच पैठण येथून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या तांत्रिक घटनेमुळे नागरिकांना चार ते पाच दिवस होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होणार असून, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केले आहे. ही दुरूस्ती करण्यासाठी मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, पाणीपुरवठा सभापती पूनम स्वामी आणि अभियंते यावर लक्ष ठेवून असल्याचेही नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी सांगितले.