२२ वर्षांपासून फरार आरोपीला शेतातून पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:00 AM2020-02-08T00:00:21+5:302020-02-08T00:00:56+5:30
दरोडा, जबरी चोरी, घरफोडीसह इतर गुन्ह्यांमध्ये २२ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले.
जालना : दरोडा, जबरी चोरी, घरफोडीसह इतर गुन्ह्यांमध्ये २२ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले. ही कारवाई शुक्रवारी सकाळी घनसावंगी तालुक्यातील हातडी गावच्या शिवारात करण्यात आली.
भुज्या बापू चव्हाण (रा. हाताडी ता. घनसावंगी) असे आरोपीचे नाव आहे. बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील सुभाष सुरजमल गोलीच्छा यांच्या घरावर २४ फेब्रुवारी १९९९ रोजी मध्यरात्री चोरट्यांनी दरोडा टाकून २१ हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. यावेळी झालेल्या मारहाणीतील जखमी महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती. मात्र, यातील आरोपी भुज्या चव्हाण हा घटनेनंतर फरार होता. फरार असलेला आरोपी चव्हाण हा त्याच्या शेतात आल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोनि. यशवंत जाधव यांना मिळाली होती. या माहितीवरून जाधव व त्यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी हाताडी शिवारातील शेतात झोपलेल्या चव्हाण याच्याविरूध्द कारवाई करून त्याला जेरबंद केले. त्याला बदनापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. यशवंत जाधव, सपोनि एम.बी.स्कॉट, रामप्रसाद रंगे, सुभाष पवार, संदीप चिंचोले यांनी केली.