३० लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:00 AM2019-01-11T01:00:39+5:302019-01-11T01:00:42+5:30
जाफराबाद पोलीसांनी देऊळझरी येथील पूर्णा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या ७ जणांविरुध्द धडक कारवाई करुन ३० लक्ष ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ९ आरोपी विरुद्ध बुधवारी रात्री ऊशीरा जाफराबाद पोलिसात गुन्हा दाखल केला
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : जाफराबाद पोलीसांनी देऊळझरी येथील पूर्णा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या ७ जणांविरुध्द धडक कारवाई करुन ३० लक्ष ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ९ आरोपी विरुद्ध बुधवारी रात्री ऊशीरा जाफराबाद पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. जाफराबाद तालुक्यात वाळू हा चर्चेचा विषय असला तरी याबाबत अनेक तक्रारी असताना सुद्धा कारवाई होत नाही. मात्र बुधवारी अचानक विना परवाना अवैध वाळू चोरी करणाºयांविरुद्ध पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जाफराबादचे सहायक पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे, परीविक्षाधिन पोलीस निरी क्षक एन.के. काकरवाल यांनी देऊळझरी शिवारातील पूर्णा नदी पात्रात गुप्त मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप जंजाळ, रा. कुंभारी, महेंद्र वायाळ, रा. सावरखेडा गोंधन, उमेश इंगळे रा. देऊळझरी, नितीन शेवत्रे, रा. ब्रह्मपुरी, विठ्ठल मुळे, रा. जवखेडा ठेंग, गणेश मोरे, रा. कुंभारी, प्रभाकर जंजाळ, रा. कुंभारी या ट्रँक्टर चालकांविरुध्द विना क्रमांकाची ट्रॅक्टर ट्रॉली, रॉयल्टीची पावती नसताना अवैध वाळू विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जाताना, सोबत वाहन चालविण्याचा परवाना नसतांनाही वाहतूक करताना दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलिसांनी पकडले. त्यांच्याविरुध्द जाफराबाद पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले.
ही कारवाई पोहेकॉ. बी. टी. सहाणे, एम. आर. सोळंके, एम. पी. बावरे, डी. बी. चव्हाण, एस. यु. तिडके, आर. व्ही. मोरे व पो.काँ सुरडकर यांनी केली.