मोबाईल हिसकावणाऱ्यास पोलिसांनी रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:20 AM2019-07-01T01:20:59+5:302019-07-01T01:21:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : मोबाईल वरती बोलत जाणा-या कामगाराचा मोबाईल हिसकावून पळालेल्या बालकास चंदनझिरा पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मोबाईल वरती बोलत जाणा-या कामगाराचा मोबाईल हिसकावून पळालेल्या बालकास चंदनझिरा पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन मोबाईलसह दुचाकी असा ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दस्तगीर खान शब्बीर खान (रा. हक्कीम मोहल्ला जुना जालना) यांनी फिर्याद दिली की, १५ जून रोजी मी मोबाईलवर बोलत जात असताना एका अनोळखी व्यक्तीने दुचाकीवरुन येऊन मोबाईल हिसकावून नेला. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांना गुप्त माहिती मिळाली की, कालिका स्टील कंपनीजवळ एक संशयित इसम तोंडाला रुमाल बांधून दुचाकी गाडीची नंबर प्लेट बदलत आहे.
मिळालेल्या माहितीवरुन सदर ठिकाणी पाहणी केली असता, पोलिसांना एक अल्पवयीन मुलगा आढळून आला. त्यास गाडीच्या नंबर प्लेट का बदलत होता, याबाबत विचारणा केली असता, त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने मोबाईलवर बोलत जाणा-या मजुरांचे मोबाईल हिसकावून नेत असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचे दोन मोबाईल व दुचाकी असा ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाले, पोलीस कर्मचारी अनिल काळे, चंदू माळी, कृष्णा भंडागे, गोविंद पवार यांनी केली.