पोलिस बंदोबस्तात टेंभुर्णीतील अतिक्रमणावर हातोडा; १६ घरे जमीनदोस्त

By दिपक ढोले  | Published: March 4, 2023 05:54 PM2023-03-04T17:54:02+5:302023-03-04T17:54:25+5:30

या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांत एकच खळबळ उडाली आहे. 

Police crack down on encroachment in Temburni: 16 houses razed | पोलिस बंदोबस्तात टेंभुर्णीतील अतिक्रमणावर हातोडा; १६ घरे जमीनदोस्त

पोलिस बंदोबस्तात टेंभुर्णीतील अतिक्रमणावर हातोडा; १६ घरे जमीनदोस्त

googlenewsNext

टेंभुर्णी(जालना) : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या टेंभुर्णी येथील अतिक्रमणावर अखेर प्रशासनाने हातोडा चालविला आहे. शनिवारी पोलिस बंदोबस्तात शासकीय गटातील १६ घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांत एकच खळबळ उडाली आहे. 

टेंभुर्णी येथील गट क्रमांक १, २, ५, १९१, १९५, २६९, ८०६ या गावठाण, गायरान, आणि शासकीय गटातील अतिक्रमणाचे प्रकरण गेल्या काही वर्षांपासून लोकायुक्त मुंबई यांच्या दरबारी सुरू आहे. यानुसार ५ हेक्टर ८० आर क्षेत्रातील जवळपास ८३० घरे अतिक्रमणाच्या विळख्यात आली होती. मात्र, यातील अनेक अतिक्रमणधारकांनी या विरोधात न्यायालयाचे द्वार ठोठावल्याने जवळपास ६०० पेक्षा अधिक घरांना न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. 

दरम्यान, प्रकरणे न्याय प्रविष्ट नसलेल्या अतिक्रमणधारकांना यापूर्वीच नोटीसद्वारे अतिक्रमण पाडण्यासंदर्भात प्रशासनाने कळविले होते. त्यानुसार शनिवारी पहिल्या टप्प्यात शासकीय गटातील ८४ अतिक्रमणधारकांपैकी स्थगिती न मिळालेल्या १६ अतिक्रमणधारकांवर ही कारवाई केली.  यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी अतिक्रमण घोषित क्षेत्रात कोणासही जाण्यास प्रतिबंध करण्यात आले होते. या कारवाईमुळे काही गरिबांचे संसार मात्र उघड्यावर आले आहेत. ही कारवाई भोकरदनचे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जाफराबादचे तहसीलदार स्वरूप कांकाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे, गटविकास अधिकारी विष्णू बोडखे, टेंभुर्णीचे एपीआय रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Web Title: Police crack down on encroachment in Temburni: 16 houses razed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.