भूखंड घोटाळ्यातील आरोपीस १६ पर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:58 AM2019-09-12T00:58:03+5:302019-09-12T00:59:09+5:30
वक्फ बोर्डाच्या जमिनीचे निकष डावलून विल्हेवाट लावणाऱ्या सैय्यद जमील सैय्यद जानीमियाँ उर्फ मौलाना जमील यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील वक्फ बोर्डाच्या जमिनीचे निकष डावलून विल्हेवाट लावणाऱ्या सैय्यद जमील सैय्यद जानीमियाँ उर्फ मौलाना जमील यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना १६ सप्टेबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
येथील सर्व्हे क्रमांक १०१, १०२ आणि १०३ मधील दर्गा शेरसवारच्या जवळपास २८ एकर जमिनीची चुकीच्या पध्दतीने निकष डावलून विल्हेवाट लावल्या प्रकरणी वक्फ बोर्डाने जमील यांच्या विरूध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हे भूखंड शहराच्या भोकरदन नाका परिसरातील असून, ज्यांची किंमत काही कोटींमध्ये जाते. या जमिनीवर इमारती, शॉपिंग सेंटर तसेच अन्य बांधकामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. या प्रकरणी वक्फ बोर्डाचे औरंगाबाद येथील मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज अहमद सिराज अहमद यांनी २७ मे २०१९ रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात मौलाना जमील याच्या विरूध्द तक्रार दाखल केली होती.
मौलाना जमील हे शेरसवार दर्गाचे अधिकृत मुतावली नसताना त्यांनी चुकीचे अधिकार वापरून जमिनीची परस्पर विक्री अनेकांना केली होती, असे तक्रारीत नमूद केले आहे. गुन्हा दाखल झाल्यावर जमील मौलाना यांनी जिल्हा न्यायालयातअटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. तो अर्ज फेटाळ्यावर त्यांनी उच्च न्यायालय तसेच नंतर सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने देखील मौलाना जमील यांचा अर्ज फेटाळला होता. हा सर्वोच्च न्यायालयाने अर्ज फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी बुधवारी त्यांना अटक केल्याची माहिती तपासाधिकारी डीवायएसपी खिरडकर यांनी दिली.
बुधवारी मौलाना जमील यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांच्याकडून या प्रकरणाचे अनेक कागदपत्रे तसेच व्यवहार तपासायचे असून, त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली होती.
न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे मान्य केले. आता या भूखंड घोटाळ्यातून नेमके काय समोर येते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.