लूट प्रकरणातील पाच जणांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 12:42 AM2019-03-02T00:42:51+5:302019-03-02T00:43:24+5:30
मारहाण करुन डोळ्यात मिरचीपूड टाकून सेल्समनचे पावनेदोन लाख रुपये लुटणाऱ्या पाचही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जालना : मारहाण करुन डोळ्यात मिरचीपूड टाकून सेल्समनचे पावनेदोन लाख रुपये लुटणाऱ्या पाचही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुजरात येथील सेल्समन जतीन मन्सूखभाई ठक्कर हे बुधवारी जालना येथील जिंदल मार्केट येथील एका कटलरी दुकानात वसुलीसाठी आले होते. त्याच कटलरी दुकानातील ओळखीच्या नोकर बाळू अप्पा लंगोटे याला सोबत घेऊन रात्री दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद निघाले होते. जालना औरंगाबाद मार्गावर असलेल्या एकता हॉटेल परिसरात आल्यानंतर बाळू लंगोटे याने लघवी करण्याच्या बहाण्याने दुचाकी थांबविताच पाठलाग करणाऱ्या पाच जणांनी अचानक हल्ला करुन ठक्कर यांना लाकडी काठीने मारहाण केली. तसेच डोळ्यात मिरचीपूड टाकून रोख १ लाख ७० हजार रुपये असलेली बॅग हिसकावून पसार झाले होते. वर्दळीच्या जालना - औरंगाबाद महामार्गावर लुटीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. जतीन ठक्कर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोनि. राजेंद्रसिंग गौर यांना माहिती कळताच त्यांनी तपासाची चके्र फिरवून बाळू रामआप्पा लंगोटे, (२४), सुशांत राजू भुरे (२०), रवी आनंद कुस्लमवार (२५), लक्ष्मण किसन गोरे (२२) अमोल एकनाथ काचेवाड (२२) यांना ताब्यात घेतले.
पकडलेले आरोपी सराईत
पकडेलेल्या पाच आरोपीपैकी दोघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. जिल्ह्यात अशा प्रकारे लुटीच्या घटनेत या टोळीचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. टोळीकडून जिल्ह्यासह इतर कोठे अशा प्रकारे लुटमार केली आहे याचा शोध घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.