कत्तलीसाठी जाणाऱ्या चोवीस जनावरांना पोलिसांनी दिले जीवदान
By दिपक ढोले | Published: March 18, 2023 04:22 PM2023-03-18T16:22:56+5:302023-03-18T16:23:04+5:30
ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असताना ग्रामस्थांनी भेंडाळा फाटा येथे दोन्ही वाहने पकडली.
जालना : दोन आयशर ट्रकमध्ये कोंबून कत्तलीसाठी जाणाऱ्या २४ जनावरांची घनसावंगी पोलिसांनी सुटका केली आहे. ही कारवाई घनसावंगी तालुक्यातील भेंडाळा फाट्याजवळ करण्यात आली. पोलिसांनी दोन आयशरसह २४ जनावरे असा एकूण २० लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी रात्री चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंभार पिंपळगाव येथील आठवडी बाजारातून २४ जनावरे खरेदी करून बेकायदेशीररीत्या दोन ट्रकमध्ये कोंबून वाहतूक केली जात होती. एका ट्रकमध्ये १४ तर दुसऱ्या ट्रकमध्ये १० जनावरे दाटीवाटीने निर्दयीपणे उभा करण्यात आली होती. ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असताना ग्रामस्थांनी भेंडाळा फाटा येथे दोन्ही वाहने पकडली. याची माहिती घनसावंगी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही ट्रकमधून जवळपास २४ जनावरांची सुटका केली. दोन्ही ट्रक जमा करून पोलिसांनी घनसावंगी पोलिस ठाण्यात उभा केले आहेत. याप्रकरणी राहुल कालिदास वरतले यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित निर्दोक्ष सुखदेव गरड, मोसीम कुरेशी (दोघे रा. आष्टी) यांच्या विरोधात घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर सुरेश गणेश सैबेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित उद्धव आश्रुबा भुतेकर व व्यापारी वसीम (दोघे रा. परतूर) यांच्याविरुद्ध घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष मरळ करीत आहेत.