पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चौकशीने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:22 AM2020-02-27T00:22:07+5:302020-02-27T00:23:30+5:30
बुधवारी विशेष कृती दलाचे निरीक्षक यशवंत जाधव आणि कदीम जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास शेळके यांच्यासह अन्य १२ कर्मचा-यांची चौकशी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना तालुक्यातील काजळा येथील रहिवासी अनिल गोरखनाथ वलेकर यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून त्यांचा मानसिक छळ करण्यात आल्याची तक्रार त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. यावरून बुधवारी विशेष कृती दलाचे निरीक्षक यशवंत जाधव आणि कदीम जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास शेळके यांच्यासह अन्य १२ कर्मचा-यांची चौकशी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वलेकर यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या खोट्या तक्रारींची सविस्तर माहिती असलेला तक्रार अर्ज गृहमंत्री, पालकमंत्री, विशेष पोलीस महानिरीक्षक, मानव अधिकार आयोग यांच्यासह अन्य विभागांकडे दिला. या तक्रारीत वलेकर यांनी सांगितले की, तुळजापूर जिल्ह्यातील नळदुर्ग, वैजापूर चोरी प्रकरण, नेवासा येथील गुन्ह्यांमध्ये अडकवून माझा मानसिक छळ केला. या प्रकरणी औरंगाबाद येथील विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी ही बाब गंभीरतेने घेऊन वलेकर यांच्या तक्रारीतील तथ्य जाणून घेण्यासाठी पैठण येथील प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी गोरख भामरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली.
या चौकशीसाठी गोरख भामरे हे सकाळीच जालन्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाले. त्यांनी दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख निरीक्षक यशवंत जाधव, कदीम पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेळके यांच्यासह, पोलीस कर्मचारी ज्ञानेदव नागरे, खंदारे, चच्हाण, आर्य, चिंचोले, आडेप, निकाळजे, गणेश जाधव, कृष्णा चव्हाण, रमेश काळे अन्य दोन जणांची चौकशी केली.
त्याचा अहवाल गोरख भामरे सायंकाळी महानिरीक्षक सिंघल यांना देणार असल्याचे सांगण्यात आले.
या संदर्भात पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ही चौकशी सुरू असल्याचे सांगून अद्याप कुठला निर्णय झाला, हे स्पष्ट होऊ शकले नसल्याचे सांगितले.
तक्रारीसोबत पुरावे जोडल्याने चौकशीला गती
वलसे यांना शिवनेरी ढाबा येथे बोलावले असताना त्यांच्या सोबत येथील प्रॉपर्टी डीलर कटारिया यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी सुभाष वैद्य हा देखील तेथे हजर होता. परंतु त्याला साधे चौकशीसाठीही ताब्यात न घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले.
या शिवनेरी ढाब्यावरील सीसीटीव्हीचे फुटेजही संबंधित तक्रारदाराने पोलिसांना दिले आहे . तसेच त्या फुटेजच्या तपासणीतील वेळ ही देखील वरिष्ठांनी तपासावी अशी मागणी त्याने केली होती.
ही चौकशी पोलीस महनिरीक्षक सिंघल यांनी त्रयस्थ अधिका-यांकडून करण्याचे निर्देश दिल्याने देखील पोलीस वर्तुळात दिवसभर चर्चा रंगली होती.