जालन्यातील जुगार अड्यावर पोलीसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:37 PM2018-09-21T12:37:20+5:302018-09-21T12:38:05+5:30
मंठा चौफुली येथे एका हॉस्पिटल समोर सुरु असलेल्या जुगार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास छापा मारला.
जालना : शहरातील मंठा चौफुली येथे एका हॉस्पिटल समोरील पथदिव्याखाली खाली सुरु असलेल्या जुगार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास छापा मारला. यात रोख रक्कमसह, मोबाईल, जुगार सहित्य असे एकूण १ लाख ७८ हजार १३० रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी १३ जुगाऱ्यांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास खबऱ्या मार्फत मंठा चौफुली येथील एका हॉस्पीटल समोर जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली. यावरून रात्री १२.३० वाजेच्या दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने येथे छापा टाकला. यावेळी काहीजण गोलाकार बसून ५२ पत्यावर पैसे लावून जुगार खेळत होते. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून जुगार साहित्य व नगदी रुपये मिळाले.
याप्रकरणी पोलिसांनी बॉनी कांबळे (३५, रा. क्रांती नगर), शेख अक्तर शेख एजाज (३२, रा. जेईएस कॉलेज रोड), शेख रिजवान शेख मन्नान (२३, रा. जेईएस कॉलेज रोड), दत्ता गिरणारे (२४, रा. मंठा चौफुली), संदिप आढेकर (२५, रा. रामनगर), अमोल नागवे (२६, रा. वानडगाव ता.जि. जालना), गजेंद्र कुंडलीक बनकर (३६, रा. काद्राबाद), मनोज ठाकूर (३०. रा. मंठा चौफुली) शेख नईम शेख खाजामिय्या (३९, रा. मंठा चौफुली) राजू हिरासिंग राठोड (३०, रा. मंठा चौफुली) करण पवार (२३, रा. मंठा चौफुली), किरण वायाळ (३४, रा. मंठा चौफुली), अविनाश जोशी (३२, रा. रामनगर ) यांना ताब्यात घेतले. तसेच जुगाराचे साहित्य व नगदी रुपये असे एकूण १ लाख ७८ हजार १३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेद्रसिंह गौर, सपोनि. लांडगे, सॅम्युअल कांबळे, समाधान तेलंग्रे, कृष्णा तंगे, सदाशिव राठोड, सचिन चौधरी, विलास चेके यांनी केली. पुढील तपास पोउपनि. जयसिंग परदेशी हे करत आहेत.