पासोडी शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांनी टाकली धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:53 AM2019-10-18T00:53:37+5:302019-10-18T00:54:03+5:30
पासोडी गावाच्या शिवारातील गांजाच्या शेतीवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरूवारी दुपारी धाड मारून दोन क्विंटल गांजाची झाडे जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन/ जाफराबाद : जाफ्राबाद तालुक्यातील पासोडी गावाच्या शिवारातील गांजाच्या शेतीवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरूवारी दुपारी धाड मारून दोन क्विंटल गांजाची झाडे जप्त केली. पोलिसांनी एकूण २० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
पासोडी शिवारातील शेतामध्ये गांजाची झाडे लावली असल्याची माहिती भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांना मिळाली होती. त्यानंतर जयभाये यांनी सदर झाडे हे गांजाचीच आहेत का, याची कृषी अधिकाºयाकडून खात्री करून घेतली. त्यानंतर पोलीस अधीक्षक एस़ चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १७ आॅक्टोबर रोजी पासोडी येथील (अंखडबेल वस्ती) गट क्रंमाक ६७ मध्ये गांजाची लागवड केलेल्या शेतावर जायभाये यांनी स्वत: धाड मारली.
त्यावेळी या ठिकाणी कपाशीच्या शेतात, बांधावर, दुसºया शेताच्या बांधाने गांजाची १७८ तब्बल झाडे लागवड केलेली आढळून आली. ही सर्व झाडे उपटून त्याचे वजन केले असता १ क्विंटल ९७ किलो वजन भरले असून, त्याची किंमत १९ लाख ७० हजार रूपये एवढी झाली. पोलिसांनी शेतमालक भालचंद्र हरचंद काकरवाल (रा. पासोडी ता. जाफराबाद) याला अटक केली. आणखी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे़
या प्रकरणात हसनाबाद पोलीस ठाण्यात रात्री उशिरा एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. यातील काही आरोपी फरार झाले असल्याचे कळते. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, जाफराबादचे सपोनि अभिजित मोरे, सपोनि ज्ञानेश्वर पायघन, पोलीस कर्मचारी रामेश्वर शिनकर, गणेश पायघन, सागर देवकर, जगदीश बावणे, नीलेश फुसे, गणपत बनसोडे, राजू डोईफोडे, नरहरी खार्डे, आधार भिसे, ईश्वर देशपांडे, उमेश टेकाळे शाबान तडवी, गजानन भुतेकर, म्हस्के-पाटील, कृषी विभागाचे सिताफळे, मंडळाधिकारी शिदे यांनी आदींनी केली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोठी कारवाई केल्याने भोकरदन, जाफराबाद तालुक्यात खळबळ उडाली आहे. गत काही महिन्यांपूर्वी टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुनील जायभाये यांनी अफूच्या शेतीवर छापा मारला होता़
दरम्यान, ज्या शेतात गांजाची लागवड केली होती. तो भाग विदर्भाला लागून आहे. त्यामुळे तिकडे सहसा कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे याच संधीचा फायदा घेऊन काकरवाल यांनी गांजाची लागवड केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
डीवायएसपींसह कर्मचारी दुचाकीवर घटनास्थळी
पासोडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर भालचंद्र कांकरवाल यांनी डोंगराळ भागातील शेतामध्ये गांजाची झाडे लावली होती. कारण त्या भागात कधीही कोणी फिरकत नाही त्यामुळे ते सुध्दा बिनधास्त होते.यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनीही शक्कल लढवली.
१७ आॅक्टोबर रोजी चार ते पाच वाजेच्या दरम्यान पोलिसाचा ताफा पासोडी गावापर्यन्त गेला मात्र त्या शेताकडेगाडी जात नव्हती त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी व त्याच्या सोबतच्या अधिकारी व कर्मचा-यानी दुचाकीवर शेतापर्यन्त गेले व दुचाकी जात नाही अशा ठिकाणी पायी जाऊन ही मोठी कारवाई यशस्वी केली आहे़