चोरीतील कारसह सव्वा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:24 AM2019-09-24T00:24:45+5:302019-09-24T00:25:05+5:30
चोरी, घरफोड्यातील हद्दपार आरोपीसह चार जणांना एडीएसच्या पथकाने जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : चोरी, घरफोड्यातील हद्दपार आरोपीसह चार जणांना एडीएसच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी सकाळी जालना शहरातील पॅलेस हॉटेलच्या मागे करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीच्या कारसह १ लाख २२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जालना शहरासह परिसरातील घरफोड्या, चोऱ्यांमधील आरोपी शहरातील पॅलेस हॉटेलच्या मागे आल्याची माहिती एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव यांना मिळाली होती. या माहितीवरून पोनि जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी सकाळी कारवाई करून गजानन सोपान सिगाडे (रा. पांचनवडगाव ता.जालना), हद्दपार असलेला हरदीपसिंग बबलूसिंग टाक (रा.गुरूगोविंदसिंग नगर, जालना), दियासिंग बरिहामसिंग कलानी (रा. हिन्दनगर जालना) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्या तिघांकडे चौकशी केल्यानंतर तीन चोरीच्या गुन्ह्याची कबली दिली. तसेच त्यांच्याकडून देऊळगाव राजा येथून चोरलेली विना नंबरची एक कार, कटर, टामी, हातोडी व इतर असा एकूण १ लाख २२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर ललूसिंग जिलेसिंग कलानी (रा. जालना) याला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव, सपोउपनि एम.बी.स्कॉट, पोहेकॉ रामप्रसाद रंगे, सुभाष पवार, नंदकिशोर कामे, पोकॉ संदीप चिंचोले, राजू पवार, आकाश कुरील, विजय निकाळजे, श्रीकुमार आडपे यांच्या पथकाने केली. संबंधितांकडून चोरीच्या इतर घटनांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
एडीएसच्या पथकाने जेरबंद केलेला आरोपी हरदिपसिंग बबलूसिंग टाक हा दोन वर्षासाठी जालना, औरंगाबाद व बुलडाणा या जिल्ह्यातून हद्दपार आहे. शिवाय त्याच्याविरूध्द विविध चोरीचे गुन्हे दाखल आहेत.