शेळ्या संभाळताना पोलिसांची दमछाक! चोरीच्या संशयावरून ३४ शेळ्या घेतल्या होत्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 09:01 PM2017-10-12T21:01:49+5:302017-10-12T21:02:01+5:30
भोकरदन पोलिसानी चोरीच्या संशयावरून सिरसगाव मंडप येथून ३४ शेळ्या ताब्यात घेतल्या होत्या. मात्र, या शेळ्यांचा मालकी हक्क सांगण्यास अद्याप कुणीच पुढे आलेला नाही.
भोकरदन (जि.जालना) : भोकरदन पोलिसानी चोरीच्या संशयावरून सिरसगाव मंडप येथून ३४ शेळ्या ताब्यात घेतल्या होत्या. मात्र, या शेळ्यांचा मालकी हक्क सांगण्यास अद्याप कुणीच पुढे आलेला नाही. त्यामुळे गत चोवीस तासांपासून ३४ शेळ्या सांभाळताना पोलिसांची तारांबळ उडाली आहे.
चोरीच्या शेळ्या असल्याच्या संशयावरून भोकरदन पोलिसांनी बुधवारी सिरसगाव मंडप येथील शेख अन्सार यांच्या घरासमोरून ३४ शेळ्या ताब्यात घेतल्या होत्या. याबाबत शेख अन्सार यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी या शेळ्यांबाबत काहीच माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी गावचे पोलीस पाटील व कोतवाल यांना या शेळ्या संभाळण्याच्या सूचना केल्या. मात्र, त्यांनी आम्ही शेळ्या संभाळणार नाही, असे सांगितले. नाईलाजास्तव पोलिसानी या शेळ्या एका टेंम्पोमध्ये भोकरदन येथील गोशाळेत आणल्या. यातील एका शेळीने बुधवारी रात्री एका पिलाला जन्म दिला. शेळ्यांसह गोशाळेतील जनावरांचा सांभाळ करणे येथील कर्मचा-यांना अवघड झाले. शेळ्या व अन्य जनावरांचे एकाच ठिकाणी वास्तव्य असल्यामुळे गोशाळेतल जनावरांना रोगाची लागण होऊ शकते, असे सांगत गो- शाळेच्या संचालकांनी गुुरुवारी सकाळी पोलिसांना सर्व शेळ्या घेऊन जाण्यास सांगितले. त्यामुळे पोलिसांनी गो शाळेतून शेळ्या काढून घेतल्या. आता या शेळ्यांना ठेवायचे कोठे हा प्रश्न भोकरदन पोलिसांना पडला आहे. गुरुवारी बुलडाणा व लोणार येथील काही नागरिक चोरीस गेलेल्या शेळ्या सापडल्याच्या माहितीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात आले. मात्र, भोकरदन पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेळ्या आपल्या नसल्याचे या नागरिकांनी सांगितले. त्यामुळे अगोदरच संख्याबळ कमी असलेल्या पोलिसांसमोर आता या शेळ्यांचा सांभाळ करायचा कुणी अशा प्रश्न आहे. सध्या भोकरदन-सिल्लोड रोडवरील एका खाजगी व्यक्तीच्या शेडमध्ये या शेळ्या ठेवण्यात आल्या आहेत.
भोकरदन पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ३४ शेळ्यांवर अद्याप कुणीही हक्क सांगितलेला नाही. या शेळ्या चोरीच्या असल्याचा संशय आहे. आम्ही त्या दृष्टीने तपास करत आहोत. सध्या तरी शेळ्या सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे.
- दशरथ चौधरी, पोलीस निरीक्षक, भोकरदन ठाणे.