भाजपचे प्रवेश सोहळे अन् शिवसेनेचे कार्यकर्ता मेळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:25 AM2018-01-31T00:25:15+5:302018-01-31T00:25:18+5:30
भाजपचे पक्षप्रवेश सोहळे, शिवसेनेचे कार्यकर्ता मेळावे, काँग्रेसची संविधान बचाव रॅली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
राजेश भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : काही दिवसांपासून भाजप पक्ष जालना शहरासह जिल्ह्यात आक्रमक झाला असून, नेत्यांनी पक्षप्रवेश सोहळे करून वातावरण निर्मितीस सुरुवात केली आहे. तर शिवसेनेनेही जिल्ह्यात सदस्य नोंदणीच्या निमित्ताने कार्यकर्ता मेळावे घेत कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपचे पक्षप्रवेश सोहळे, शिवसेनेचे कार्यकर्ता मेळावे, काँग्रेसची संविधान बचाव रॅली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
जिल्ह्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेत वातावरण तापविण्याचा प्रयत्न चालविला आहे. सत्ताधारी भाजपने प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनाच मैदानात उतरवून इतर पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपत प्रवेश देण्याचा सपाटा सुरु केला आहे. जालना शहरात गत एक महिन्यात सात ते आठ पक्षप्रवेश सोहळे पार पडले आहेत. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या तत्त्वाने इतर पक्षांतील नाराजांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर, आ. नारायण कुचे, जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उपाध्यक्ष भास्करराव दानवे, माजी आ. विलास खरात, अरविंद चव्हाण, जि. प. सदस्य राहुल लोणीकर, सुनील आर्दड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सक्रिय झाले असून, आगामी निवडणुकीची व्यूहरचना आखली जात आहे. शहरातील या सोहळ्यांमुळे शहरात भाजपची ताकद वाढत असली तरी इतर पक्षांनीही राजकीय डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेनेने जिल्ह्यात सदस्य नोंदणी अभियान राबविले. तसेच कार्यकर्ता मेळावे घेऊन पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांत स्फुल्लिंग चेतविण्याचा प्रयत्न केला. राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, डॉ. हिकमत उढाण, माजी आ. शिवाजी चोथे, माजी आ. संतोष सांबरे, लक्ष्मण वडले, रमेश गव्हाड आदींनी जिल्हा पिंजून काढला आहे. कडवे शिवसैनिकच पक्षाला जिल्ह्यात संजीवनी देऊ शकतात, ही बाब पक्ष धुरिणांनी हेरुन सदस्य नोंदणीतून पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात राजकीय शक्ती वाढविण्याचा प्रयत्न सत्ताधा-यांकडून केला जात असला तरी प्रमुख विरोधी पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही मैदानात उतरले असून, कर्जमाफीसह इतर मुद्द्यांवर हल्लाबोल मोर्चा काढून नाकर्त्या सरकारवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. राजेश टोपे, बबलू चौधरी, कपिल आकात आदी प्रमुख नेत्यांनी टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंठा, घनसावंगी, बदनापूर आणि जाफराबाद येथे काढलेल्या हल्लाबोल मोर्चास नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या मोर्चात राष्ट्रवादीचे सर्वच प्रमुख नेते सहभागी झाल्याने पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांत चैतन्य पसरले आहे. तर काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या संविधान बचाव रॅलीने सत्ताधाºयांची झोप उडविली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, आर. आर. खडके, भीमराव डोंगरे, अब्दुल हाफीज, राजाभाऊ देशमुख, बाबूराव कुलकर्णी, विमल आगलावे, विजय कामड, प्रा. सत्संग मुंडे, ज्ञानदेव पायगव्हाणे, अंकुशराव राऊत, दिनकर घेवंदे, राम सावंत, राजेंद्र राख, राजेश काळे, नीळकंठ वायाळ, शेख महेमूद आदींनी सक्रिय भूमिका घेतल्याने पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून हे पक्ष आक्रमक झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याचे संकेत मिळत आहेत. याची तयारी आतापासूनच सुरु झाली असून, आपापली राजकीय ताकद वाढविण्याच्या दिशेने सर्वच राजकीय पक्ष सरसावले आहेत. पक्षप्रवेश सोहळे, कार्यकर्ता मेळावे, मोर्चा व रॅलीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, यातून कोणत्या पक्षाचा जनाधार वाढतो आणि याचे रुपांतर मतदानात किती प्रमाणात होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.